

नांदेड (प्रतिनिधी)-शहरात विविध भागात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी रक्तदान, अन्नदान यासह विविध उपक्रमाद्वारे ही जयंती साजरी करण्यात आली.
नांदेड शहर सर्वत्र शिवमय व भगवेमय झाले आहे. मुख्य रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे बॅनर अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत. छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी नांदेड शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले होते. यात मोटारसायकल रॅली, रक्तदान शिबिर, अन्नदान, व्याख्यान, मिरवणुका यासह अनेक कार्यक्रम मोठ्या उत्साहाच्या वातावरणात सकाळपासूनच सुरू झाले होते. काल रात्रीपासूनच छत्रपतींच्या मावळ्यांचा उत्साह वाढताना पहावयास मिळत होता. रात्री 12 वाजेच्यानंतर शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली होती. तसेच सकाळी दुचाकी रॅली, भगवे झेंडे हातात घेऊन छत्रपती शिवरायांचा जयघोष करत आपल्या राजाला अभिवादन करण्यासाठी त्यांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याकडे जाताना दिसत होते. शनिवारी सकाळीच जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण, खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, आ. बालाजी कल्याणकर, महापौर जयश्री पावडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, उमेश मुंडे, आनंद बोंढारकर, माजी मंत्री डी. पी. सावंत, आ. अमर राजूरकर, भाजपचे प्रवीण साले, दिलीप कंदकुर्ते, प्रणिता देवरे, चैतन्यबापू देशमुख, डॉ. शितल भालके, प्रजासत्ताक पार्टीचे सुरेश गायकवाड, पी. एस. गवळे, प्राध्यापक मनोहरे, राहुल गायकवाड, नंदकुमार बनसोडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हरीहरराव भोसीकर, भगवानराव पाटील आलेगावकर, उपमहापौर अब्दुल गफार, सत्यपाल सावंत, पप्पू कोंडेकर, संगीता डक, आनंद चव्हाण, किशोर स्वामी, सतीश देशमुख, रमेश कोकाटे पाटील, माधव पावडे, शाम कोकाटे पाटील, शिक्षणाधिकारी सविता बिर्गे यांच्यासह अनेकांनी अभिवादन केले. शिवभक्तांना मिरवणुकीदरम्यान थंड पाण्याची व्यवस्था, अन्नदान आणि काही ठिकाणी फळांचे वाटप काही सामाजिक संस्था करीत होत्या. त्याचबरोबर आयटीआय चौकात विष्णु कॉम्प्लेक्स येथे व्यापारी गौतम जैन(धोका) यांच्यावतीने थंडपेय वाटप करण्यात आले.

