नांदेड(प्रतिनिधी)-काल दि.१९ फेबु्रवारी रोजी मगनपुरा भागात एका २० वर्षीय युवकाचा खून केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीसांनी २४ तासात ४ जणांना अटक केली आहे. या खुनाच्या तक्रारीमध्ये सहा जणांची नावे आहेत. या प्रकरणातील मयत अनिल मुरलीधरराव शेजुळेचे वडील यांनी दिलेल्या अर्जानुसार या प्रकरणातील फिर्यादीनेच त्यांच्या मुलाचा खून करायला लावला आहे.
चिखली ता.जि.नांदेड येथील अनिल मुरलीधरराव शेजुळे (२०) त्याला त्याचा चुलत काका राजकुमार एकनाथ शेजुळे (२८) याने दुपारी २ वाजता चिखली येथून आणले. त्यांच्यासोबत तिसरा राजकुमार शेजुळेचा भाचा पण होता. सायंकाळी ५ वाजेच्यासुमारास गाडीचा कट मारला म्हणून एका युवकाच्या बाचा-बाचीचे पर्यवसन अनिल शेजुळेच्या खूनात झाले. अनिल शेजुळेला दवाखान्यात नेण्यापुर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. राजकुमार शेजुळेच्या तक्रारीवरुन शिवाजीनगर पोलीसांनी सहा नावांच्या आरोपीविरुध्द गुन्हा क्रमांक ६७/२०२२ दाखल केला.
या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक गायकवाड यांच्याकडे देण्यात आला. घटनेला २४ तास होण्यापुर्वीच पोलीस प्राथमिकीमध्ये नमुद असलेल्या सहा आरोपींपैकी चार आरोपींना आज पोलीसांनी अटक केली आहे. त्यांची नावे पुढील प्रमाणे निलेश रावसाहेब गोरठेकर (२२) रा.बाबानगर नांदेड, राहुल नागनाथ काळे(२२) रा.खोब्रागडेनगर नांदेड, रोहित उर्फ चिंक्या सुभाष मांजरमकर (२१) पौर्णिमानगर नांदेड, योगेश उर्फ गोट्या चंदर सोनकांबळे (२२) रा.हर्षनगर नांदेड आहेत.या गुन्ह्यातील तपासाच्या प्रगतीसाठी या चौघांना उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.
