आज कर्दनकाळ पोलीस निरिक्षक श्री अशोकरावजी घोरबांड यांनी एका तासाचा अवधी दिला; तो ही संपला

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन शासकीय इमारतीवर कांही कुटूंबांनी मागील 15 दिवसांपासून कब्जा मारला आहे. आठ दिवसांपुर्वी सुध्दा महसुल यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी हा कब्जा सोडण्यासाठी सांगितले होते. आज पुन्हा एकदा महसुल विभागातील मंडाळाधिकारी नागरवाड, तलाठी मनोज देवणे व इतर अनेक जण नांदेड ग्रामीणचा फौजफाटा घेवून तेथे आले आहेत. पण कब्जा मारणारी मंडळी शेकडोच्या संख्येत आहे. कांही खास सुत्रांनी सांगितले की, पोलीस निरिक्षक श्री. अशोकरावजी घोरबांड साहेबांनी या कब्जा मारणाऱ्या लोकांना एक तासाची वेळ दिली आहे. पण अद्याप या इमारती रिकाम्या झालेल्या नाहीत.
महसुल विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी नांदेड ग्रामीण पेालीस ठाण्याच्या हद्दीत तीन निवासी इमारती बांधण्यात आल्या. या इमारती तयार होवून जवळपास दोन वर्ष झाली आहेत. पण आजपर्यंत या इमारतीमध्ये कोणताही शासकीय महसुल अधिकारी किंवा कर्मचारी वास्तव्यास आलेला नाही. मागील पंधरा दिवसांपुर्वी या भागात राहणाऱ्या सिकलकरी समाजातील महिला आणि पुरूषांनी या तीन इमारतींमधील जवळपास 70 ते 80 सदनिकांवर आपला कब्जा मारला आणि शेकडोच्या संख्येत ही मंडळी आपल्या मुलाबाळांसह तेथे राहत आहे. महसुल यंत्रणेला किंवा पोलीसांना याचा कांही एक थांगपता लागला नाही म्हणे. आठ दिवसांपुर्वी महसुल विभागाच्या कांही अधिकाऱ्यांनी कब्जा मारणाऱ्यांना कब्जा रिकामा करण्याचा सुचना दिल्या होत्या.पण त्यांनी आजपर्यंत तरी कब्जा सोडलेला नाही. सिकलकरी समाजाच्या कांही मंडळींनी सांगितले की, आम्ही पालींमध्ये राहतो. आम्हाला घरकुल मिळावे. या इमारती अनेक वर्षांपासून रिकाम्या पडलेल्या आहेत. म्हणून आम्ही यात आसरा घेतलेला आहे.
नांदेड जिल्हा पोलीस दलाचे वार्षिक परिक्षण पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांच्यावतीने सध्या सुरू आहे. आज निसार तांबोळी इतवारा उपविभागाची तपासणी करत आहेत. अशा परिस्थितीत सुध्दा नांदेड ग्रामीणचे अत्यंत कर्तव्यदक्ष पोलीस निरिक्षक श्री अशोकरावजी घोरबांड साहेब यांनी आपल्या पाच ते दहा पोलीस कर्मचाऱ्यांना या इमारतीजवळ उभे केले आहे. खात्रीलायक सुत्रांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी कब्जा मारणाऱ्यांना एकातासात कब्जा रिकामा करण्याच्या सुचना दिल्या आहेत. पण वृत्त लिहिले तेंव्हा एक तास संपून अनेक तास झाले होते. वृत्तलिहितांना माहिती घेतली तेंव्हा पोलीस निरिक्षक श्री अशोकरावजी घोरबांड साहेब त्या ठिकाणी नव्हते. शासकीय इमारतीवर बळजबरीने कब्जा मारण्याचा हा प्रकार तसा धक्कादायकच आहे. या भागातील महसुल विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस विभागाला याची माहितीच प्राप्त झाली नाही. यावर विश्र्वास बसत नाही. कारण कब्जा मारणाऱ्या मंडळींनी गॅलरीमध्ये आपले कपडे वाळायला टाकलेले आहेत. शासकीय इमारती आहेत तर त्या भागात वावरणारी मंडळी ही शासकीय नाही हे लगेच लक्षात येते असो. सध्या महसुल विभागाच्या तीन इमारतींवर कब्जा मारणाऱ्या या शेकडो लोकांचे काय होणार हे काय आता निश्चित झालेले नाही.
