नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलाची वार्षिक तपासणी सुरू आहे. या दरम्यान पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांच्या हस्ते पोलीस अधिक्षक कार्यालयात तयार करण्यात आलेल्या प्रतिक्षालयाचे उद्घाटन करण्यात आले.
नांदेड पोलीस परिक्षेत्रातील विशेष पोलीस महानिरिक्षक कार्यालयाचे पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांच्यावतीने नांदेड जिल्हा पोलीस दलाची वार्षिक तपासणी प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया 3 मार्च 2022 पर्यंत चालणार आहे. या दरम्यान पोलीस अधिक्षक कार्यालयात येणाऱ्या व्यक्तींसाठी एक प्रतिक्षालय तयार करण्यात आले. त्या प्रतिक्षालयाचे उद्घाटन निसार तांबोळी यांनी केले. या प्रतिक्षालयात सायबर या पध्दतीने होणारे गुन्हे व त्यावरील उपाय यासाठी जनजागृती करणारे बॅनर्स लावण्यात आले आहेत. उद्घाटन प्रसंगी पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, मुख्यालयाच्या पोलीस उपअधिक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, सायबर विभागाचे पोलीस निरिक्षक नितीन काशीकर, पोलीस कल्याण विभागाचे पोलीस निरिक्षक भगवान धबडगे, जनसंपर्क विभागाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवाजी लष्करे, सायबर सेल विभागाचे सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार या प्रसंगी उपस्थित होते.
नांदेड जिल्हा पोलीस दलातील सायबर सेलच्या विभागाने चांगली कामगिरी केली आहे. भविष्यात जनतेची सायबर सेल विभागातून शक्य असेल ती मदत या विभागातील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी करावी अशा सुचना निसार तांबोळी यांनी दिल्या. याप्रसंगी सायबरचे पोलीस निरिक्षक नितीन काशीकर यांनी सांगितले की, ज्या-ज्या व्यक्तींनी या प्रतिक्षालयात जोडलेले बॅनर वाचले तर ते निश्चितच सायबर फसवणूकीपासून सुरक्षीत राहतील.
पोलीस अधिक्षक कार्यालयातील प्रतिक्षालयाचे उद्घाटन निसार तांबोळी यांच्या हस्ते