नांदेड(प्रतिनिधी)-हज यात्रेला घेवून जातो अशी बतावणी करून 123 लोकांकडून 1 कोटी 98 लाख 55 हजार रुपये गंडविणाऱ्या पिता-पुत्रापैकी पुत्राला नांदेडच्या आर्थिक गुन्हा शाखेने तीन वर्षानंतर अटक केली. आज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्रविण कुलकर्णी यांनी हजयात्रेच्या नावावर घोटाळा करणाऱ्या एकाला 25 फेबु्रवारीपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
2019 मध्ये कराड जि.सातारा येथे राहणाऱ्या मजहर सुलेमान कागदी यांनी नांदेडच्या इतवारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, नांदेडच्या सुनाभट्टी, देगलूर नाका भागात राहणाऱ्या शेख खालेद सिद्दीकी शेख वाजेद सिद्दीकी(34) आणि त्याचे वडील शेख वाजेद सिद्दीकी शेख हैदर सिद्दीकी यांनी त्यांना हजयात्रेला नेण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये गंडविले आहेत. यावरुन इतवारा पोलीस ठाण्यात दोन्ही सिद्दीकी पिता पुत्रांविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 406 आणि 34 नुसार गुन्हा क्रमांक 339/2019 दाखल झाला. या प्रकरणात ज्या लोकांना गंडविले गेले. यांची संख्या आणि रक्कम हळुहळु वाढत गेली. त्यामुळे हा गुन्हा नांदेडच्या आर्थिक गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आला.
सन 2019 पासून हे दोन्ही पिता पुत्र फरार होते. आर्थिक गुन्हा शाखेत नव्याने रुजू झालेल्या पोलीस निरिक्षक माणिक बेद्रे यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथकाने काल दि.22 फेबु्रवारी रोजी खालेद सिद्दीकी वाजेद सिद्दीकी यास अटक केली आज दि.23 फेबु्रवारी रोजी आर्थिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक हनुमंत मिटके, पोलीस अंमलदार दिलीप जाधव, बालाजी पवार आणि सुभाष कदम यांनी पकडलेल्या खालेद सिद्दीकीला न्यायालयात हजर केले. आजपर्यंत या प्रकरणात 123 जणांकडून हज यात्रेला नेण्याचे आमिष दाखवून या दोन्ही पितापुत्रांनी 1 कोटी 98 लाख 55 हजार रुपये गंडवले आहेत असे सादरीकरण करून पोलीस कोठडी मागण्यात आली. न्यायाधीश प्रविण कुलकर्णी यांनी खालेद सिद्दीकीला 25 फेबु्रवारी 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हज यात्रेच्या आमिषाखाली बळी पडून या प्रकरणात फिर्यादी झालेल्या पाच जणांचा मृत्यू सुध्दा झाला आहे.