नांदेड(प्रतिनिधी)-विष्णुपूरी येथील सरकारी रुग्णालयात काम करणाऱ्या अधिपरिचारीकेला लग्नाचे आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन करून 4 लाख 12 हजार 500 रुपये रोख रक्कम गंढविणाऱ्या भामट्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
नांदेड सरकारी रुग्णालयात काम करणाऱ्या अधिपरिचारिकेने दिलेल्या तक्रारीनुसार एका ठकसेनाने जीवनसाथी या संकेतस्थळावर आपले सुंदर प्रोफाईल तयार करून त्याद्वारे नांदेडच्या 29 वर्षीय अधिपरिचारीकेशी संपर्क साधला. इसरो या भारतातील संशोधन संस्थेत मी अभियंता असल्याचे बनावअ प्रदर्शन करून वेेगवेगळी कारणे सांगून अधिपरिचारीकेकडून 4 लाख 12 हजार 500 रुपये गंडविले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अधिपरिचारिकेने तक्रार दिली त्यानुसार गुन्हा क्रमांक 115/2022, भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 406 नुसार नांदेड ग्रामीण पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक महेश कोरे यांच्याकडे देण्यात आला आहे.
खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अधिपरिचारीकेने आपल्याकडे पैसे नसतांना कर्ज काढून या भामट्याला पैसे दिले आहेत. हा भामटा आदर्श उर्फ नहुश उर्फ तन्मय प्रशांत म्हात्रे रा.मुंबई हा आहे. या भामट्याविरुध्द मुंबईला सुध्दा असाच गुन्हा दाखल झालेला आहे. या भामट्याने अनेक महिलांची फसवणूक करून त्यांच्याकडून रक्कम लाटलेली आहे.
असे अनेक प्रकार घडतात तरीपण युवतींना या बद्दल का कळत नाही, कोणावर विश्र्वास करतांना त्याची तपासणी का होत नाही, प्रेमाच्या अडीच अक्षरांमध्ये फसवणूक किती मोठी आहे या संदर्भाने कालच गंगुबाई नावाचा एक चित्रपट सुध्दा प्रदर्शीत झाला आहे. आता तरी महिलांनी कोणत्या पुरूषावर विश्र्वास करण्याअगोदर त्याची अनेकदा तपासणी करून खात्री करावी अशी अपेक्षा आहे.
जीवनसाथी या संकेतस्थळावरुन नांदेडच्या अधिपरिचारिकेला 4 लाख 12 हजारांना गंडविले