नांदेड(प्रतिनिधी)-सन 2021 पासून मकोका कायद्यातील एका फरार आरोपीला जेरबंद करण्यात नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या दरोड्याखोराविरुध्द नांदेडसह पुण्यामध्ये सुध्दा अनेक गुन्हे दाखल आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार नांदेड जिल्ह्यात अनिल पंजाबी आणि त्याच्या टोळीविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 395 नुसार गुन्हा क्रमांक 379/2021 शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला. त्या गुन्ह्यात पुढे मकोका कायद्याची वाढ झाली. यातील कांही गुन्हेगारांना पोलीसंानी पकडले होते. त्यातील एक शेख अजरोद्दीन उर्फ बांगा शेख रहिमोद्दीन रा.श्रावस्तीनगर हा पळून गेला होता. या फरार आरोपीचा शोध घेत असतांना नांदेडचे पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांना मिळालेल्या माहितीनुसार शेख अजरोद्दीन उर्फ बांगा हा मुगट येथे आहे. त्यांनी स्थानिक गुन्हा शाखेला या दरोडेखोराला जेर बंद करण्याचे आदेश दिले.
अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग भारती, पोलीस उपनिरिक्षक सचिन सोनवणे, आशिष बोराटे, सहाय्यक पोलीस उपनिरिक्ष श्री.गोविंदरावजी मुंडे साहेब , पोलीस अंमलदार जसवंतसिंघ शाहु, भानुदास वडजे पाटील, सखाराम नवघरे, मारोती तेलंग, श्रीमान संजय केंद्रे साहेब, विलास कदम, गजानन बैनवाड, पद्मसिंह कांबळे, राजू सिटीकर, विठ्ठल शेळके, मोतीराम पवार यंानी 27 फेबु्रवारी रोजी शेख अजरोद्दीन उर्फ बांगा या दरोडेखोराला अटक केली. त्याच्याकडून एम.एच.14 बी.सी.0289 ही 15 लाखांची दुचाकी गाडी व मोबाईल असा 15 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शेख अजरोद्दीन उर्फ बांगा याच्याविरुध्द नांदेडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोन, विमानतळ पोलीस ठाण्यात एक, नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात एक, कोंडवा जि.पुणे येथे तीन, वानवाडी जि.पुणे येथे एक आणि कोरेगाव जि.पुणे येथे एक असे एकूण 9 दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांनी नांदेड जिल्हा पोलीस दलाचे कौतुक केले आहे.
मकोका फरार आरोपी बांगाला नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने पकडले