मकोका आरोपी बांगा 5 मार्च पर्यंत पोलीस कोठडीत

नांदेड(प्रतिनिधी)-शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या मकोका प्रकरणातील एक आरोपी स्थानिक गुन्हा शाखेने पकडल्यानंतर त्यास विशेष न्यायाधीश, मकोका न्यायालय के.एन. गौतम यांनी 5 मार्च 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
रुपा गेस्ट हाऊस येथे कांही दरोडेखोरांनी लुट केली होती. त्यावेळी विष्णुकांत हरी केंद्रे यांच्या तक्रारीवरुन भारतीय दंड संहितेच्या कलम 395 व भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्यात अनिल सुरेश पवार उर्फ अनिल पंजाबी, दमेमसिंग उर्फ पाजी जोगेंद्रसिंग चव्हाण, शेख अजहर शेख अन्वर, शेख सलमान शेख युसूफ यांना अटक झाली. यांच्यासोबत एक विधीसंघर्षग्रस्त बालक आणि इतर लोकांनी मिळून अनेक दरोड्याचे गुन्हे घडविले आहेत. या प्रकरणात पुढे 7 ऑक्टोबर 2021 रोजी मकोका कायद्याची वाढ झाली. त्यामुळे या गुन्ह्याचा तपास नांदेड शहरातील शहर उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक यांच्याकडे वर्ग झाला.
काल दि.27 फेबु्रवारी रोजी या गुन्ह्यातील एक फरार आरोपी शेख अझरोद्दीन उर्फ बांगा शेख रहिमोद्दीन (27) रा.श्रावस्तीनगर यास नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने पकडले. आज 28 फेबु्रवारी रोजी नांदेड शहर उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक यांनी शेख अझरोद्दीन उर्फ बांगाला न्यायालयात हजर केले. सरकारी वकील ऍड. यादव तळेगावकर यांनी या आरोपीला पोलीस कोठडी मिळण्यासाठी केलेला युक्तीवाद ग्राह्य मानुन न्या.के.एन.गौतम यांनी शेख अझरोद्दीन उर्फ बांगाला 5 मार्च 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *