
नांदेड(प्रतिनिधी) -भारत निवडणुक आयोगाने 25 जानेवारी ते 15 मार्च दरम्यान राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत मतदारांनी, विद्यार्थी, विद्यार्थींनीनी भाग घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड तथा जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी आणि नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या आयुक्तांनी केले आहे.
उप आयुक्त निवडणुक नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड यांच्या स्वाक्षरीने प्रसिध्दीसाठी पाठवलेल्या पत्रानुसार भारत निवडणुक आयोगाने 2022 च्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त माझे मत माझे भविष्य- एका मताचे सामर्थ ही राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा ऑनलाईन सुरू केली आहे. या स्पर्धेमध्ये प्रश्नमंजुषा, घोषवाक्य, गित, व्हिडीओ आणि भितीचित्र अशा पाच प्रकारच्या स्पर्धा होणार आहेत. प्रश्नमंजुषामध्ये निवडणुकीबाबतची जागरुकता पातळी जाणून घेण्याचा प्रयत्न होणार आहे. आकर्षक घोषवाक्य तयार करायचे आहेत. गित स्पर्धेमध्ये मध्यवर्ती संकल्पनेवर मुळ गित रचना तयार आणि शेअर करता येतील. गाण्याचा वेळ 3 मिनिटापेक्षा जास्त नसावा. व्हिडीओ स्पर्धेमध्ये भारतीय निवडणुकांचा उत्सव व त्यातील विविधता साजरी करणारा एक मिनिटाचा व्हिडीओ तयार करायचा आहे. भितीचित्र स्पर्धांमध्ये स्पर्धक डिजिटल किंवा रंगविलेली चित्रे पाठवू शकतात.
ही स्पर्धा संस्थात्मक श्रेणी, व्यवसायीक श्रेणी, हौशीश्रेणी अशा तीन श्रेणींमध्ये होणार आहे. प्रत्येक श्रेणीतील पहिल्या तीन विजेत्यांना भरीव स्वरुपाची आकर्षक रोख पारितोषके तसेच विशेष उल्लेखनिय रोख पारितोषीके दिली जाणार आहेत.
स्पर्धकांनी तपशिल वाद मार्गदर्शक तत्वे, नियम व अटी यांच्या माहितीसाठी संकेतस्थळा ecisveep.nic.in/contest येथे भेट द्यावी. स्पर्धकांनी त्यांच्या प्रवेशिका 15 मार्च 2022 पर्यंत सर्व तपशीलासह voter-contest@eci.gove.in या ईमेलवर पाठवाव्यात. निवडणुक आयोगातर्फे गठीत परिक्षण मंडळ विजयी प्रवेशिकांची निवड करेल.
या राष्ट्रीय मतदार जागृती अनुषंगाने आयोजित स्पर्धेत जास्तीत जास्त शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थींनी, महिला, नागरीक व सर्व मतदारांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
