नांदेड(प्रतिनिधी)-महानगरपालिकेच्यावतीने नांदेड शहरातील नागरीकांकडून वसुल केला जाणारा एनए टॅक्स (अकृषीक कर) बळजबरीचाच आहे. हे तहसीलदार नांदेड यांचे एक पत्र प्राप्त झाल्यानंतर समोर आले आहे.
नांदेडचे तहसीलदार किरण अंबेकर यांनी 9 डिसेंबर 2021 रोजी आयुक्त नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका यांना जमीन महसुल वसुलीबाबत एक पत्र लिहिले आहे. त्यात सन 2021-22 चे महसुली वसुलीचे उद्दिष्ठ पुर्ण करण्यासाठी मालमत्ता कर पावतीमध्येच अकृषीक कर रकाना जोडण्यात आला आहे आणि त्यात अकृषीक कर जोडला जात आहे.
या कर पावतीमध्ये असे निदर्शनास आले आहे की, या यादीमध्ये नजर चुकीने धार्मिक स्थळ, शैक्षणिक स्थळ (शैक्षणिक स्थळाची जागा वैयक्तीक मालकीची नसावी), शासकीय कार्यालय, गावठाणची जागा, सार्वजनिक पुजा, आर्चेसाठी दिलेल्या जागा यांना सुध्दा अकृषीक कराची आकारणी लावण्यात आलेली आहे. महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 च्या खंड 1 मधील कलम 117 नुसार अशा मालमत्ता अकृषीक कर आकारणीतून वगळण्यात आल्या आहेत. म्हणून आपल्या वसुली लिपिकांना वसुली करण्यापुर्वी वर लिहिलेल्या सर्व स्थळांबाबत खात्री करूनच अकृषीक कराची वसुली करावी.
सध्या महानगरपालिकेच्यावतीने मार्च महिन्याच्या पार्श्र्वभूमीवर कराची वसुली अत्यंत जोरदारपणे सुरू आहे. अनेक लोकांच्या कर पावतीमध्ये गावठाण क्षेत्रात त्या जागा असतांना सुध्दा त्यांच्याकडे 40 हजार ते 1 लाख रुपये अकृषीक कर दाखवला जात आहे. ज्या संपत्तींच्या जागा गावठाण क्षेत्रात आहेत. त्या सुध्दा महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियमांनुसार अकृषीक करातून वगळलेल्या आहेत. तरीपण महानगरपालिकेच्यावतीने नांदेडच्या नागरीकांवर अकृषीक कराच्या वसुलीचा जिजियाकर वसुल केला जात आहे.
महानगरपालिकेमध्ये कॉंगे्रसची एक हाती सत्ता आहे. महानगरपालिकेतील महापौर, नगरसेवक, इतर पदाधिकारी नांदेडच्या नागरीकांचे प्रतिनिधित्व करतात. पण जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश आहे असे सांगून अकृषीक कराची बळजबरी वसुली सुरूच आहे. एखाद्या व्यक्तीने सांगितलेच तरी आम्हाला कायदा दाखवा असे बोलले जाते. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ही चुक आजपर्यंत मान्य केली नाही. तहसील कार्यालयाने मनपा आयुक्तांना दिलेल्या या पत्राचा जावक क्रमांक 2021/ वसुली/ अकृषीक कर, प्र.कृ./ सीआर दिनांक 9 डिसेंबर 2021 असा आहे. आता जनतेनेच या अकृषीक कर वसुलीविरुध्द आवाज उठविण्याची गरज आहे.
गावठाण क्षेत्रातून महानगरपालिका अकृषीक कर बळजबरीने वसुल करते