मराठी भाषा गौरव सोहळ्यात कुलगुरूंनी केली घोषणा
नांदेड(प्रतिनिधी)-मराठी ज्ञानभाषा व्हावी यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ सातत्याने प्रयत्न करत आहे. यासोबतच भिन्नभिन्न भाषिकांमध्ये संवाद प्रस्थापित करण्यासाठी विद्यापीठामध्ये लवकरच बहुभाषिक साहित्य संमेलन आयोजित करण्यात येत आहे. देशभरातील श्रेष्ठ लेखक-कवींना यानिमित्ताने विद्यार्थ्यांशी संवाद साधता येईल, अशी घोषणा कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात केली.
विद्यापीठातील भाषा वाङ्मय व संस्कृती अभ्यास संकुल आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कुलगुरू डॉ. उद्धव भोसले अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. वैजयंता पाटील, डॉ.दिपक बच्चेवार, मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. अजय टेंगसे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एल. एम. वाघमारे, पत्रकार राम शेवडीकर, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात मराठी भाषेची प्रतिज्ञा घेऊन करण्यात आली. भाषा संकुलातील प्राध्यापकांनी यावेळी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या कवितांच्या भाषांतराचे अभिवाचन केले. प्रारंभी डॉ. केशव सखाराम देशमुख यांनी कुसुमाग्रजांची कविता मराठी भाषेत सादर केली. तदनंतर डॉ. शैलजा वाडीकर, डॉ. नीना गोगटे, डॉ. झिशान अली, डॉ. पृथ्वीराज तौर यांनी अनुक्रमे इंग्रजी, फ्रेंच, स्पॅनिश व हिंदी भाषेतील भाषांतरांचे अभिवाचन केले.
संकुलातील प्राध्यापक डॉ. वैजनाथ अनमुलवाड यांनी लिहिलेल्या ‘रंग सारे मिसळू द्या’ या बालकवितासंग्रहाचे प्रकाशन कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या हस्ते झाले.
विद्या सुर्वे बोरसे यांनी लिहिलेल्या ‘कोरा कागद निळी शाई’ हा ग्रंथ यावेळी सर्व मान्यवरांना भेट देण्यात आला. या समीक्षाग्रंथाचा दाखला देत बालकुमारसाहित्य या विषयात विद्यापीठ आगामी काळात नवे उपक्रम हाती घेईल असे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यावेळी म्हणाले. उपयोजित मराठी, मराठवाडी बोली या संदर्भातील नवे प्रकल्प संकुलात लवकरच सुरू केले जातील असेही कुलगुरूंनी सांगितले.भाषा संकुलातील नेट-सेट उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा आई-वडिलांसह सत्कार कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नीना गोगटे यांनी केले. कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. पृथ्वीराज तौर यांनी प्रास्ताविक केले तर विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. ज्ञानोबा मुंढे यांनी आभार मानले.कार्यक्रमाला डॉ. दिलीप चव्हाण, डॉ. रमेश ढगे, डॉ. पी. विठ्ठल, डॉ. योगिनी सातारकर यांच्यासह विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.