नांदेड(प्रतिनिधी)-महानगरपालिके च्या स्थायी समितीने आज ऑनलाईन बैठकीत 1 लाख 83 हजार 229 रुपयांचा शिलकी अंदाज पत्रक स्थायी समितीचे सभापती किशोर स्वामी यांना सादर करण्यात आला.
महानगर पालिकेचा सन 2021-22 चा सुधारित व सन 2022- 23 चा मुळ अंदाज पत्रक मान्यता देवून ते मान्यतेसाठी मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने यांनी प्रशासनाच्यावतीने स्थायी समिती सभापती किशोर स्वामी यांच्याकडे ऑनलाईन बैठकीत सादर केला. यावेळी मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने यांनी सांगितले. 2021-22 चा मुळ अर्थसंकल्प 969.30 कोटीचा होता. या कालावधीत सुधारीत अर्थसंकल्प 914.48 कोटीचा होत आहे. सन 2022-23 चा अर्थ संकल्प 1095.33 कोटीचा आहे. त्यात 1 लाख 83 हजार 229 रुपये एवढा निधी शिल्लक राहत आहे. स्थायी समितीच्या सभागृहात हा अर्थसंकल्प सादर झाल्यावर सदस्यांनी अर्थसंकल्पाच्या अभ्यासासाठी 10 दिवसांचा कालावधी मागितला आहे.
आजच्या ऑनलाईन विशेष अर्थसंकल्प सभेत अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब मनोहरे, गिरीश कदम, उपआयुक्त शुभम क्यातमवार, मुख्य लेखापरिक्षक टी.एल.भिसे, मुख्य लेखाधिकारी अश्र्वीनी नराजे, लेखाधिकारी शोभा मुंडे, नगरसचिव अजितपालसिंघ संधू, सदाशिव पतंगे यांच्यासह समिती सदस्य अब्दुल हाफीज, राजू काळे, महेंद्र पिंपळे आदी उपस्थित होते.