नांदेड(प्रतिनिधी)-गावातील नमुना क्रमांक 8 वर तक्रारदाराच्या भुखंडाची नोंद घेण्यासाठी बाचेगाव ता.धर्माबाद येथील ग्रामसेवकाने घेतलेल्या दहा हजाराच्या लाच प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यास जेरबंद केले आहे.
बाचेगाव ता.धर्माबाद येथील एका तक्रारदाराने दि.10 मार्च रोजी तक्रार दिली की, त्याने खरेदी केलेल्या भुखंडाची नोंद गाव नमुना क्रमांक 8 मध्ये घेण्यासाठी बाचेगावचे ग्रामसेवक यादव गंगाराम शिंगणे हे दहा हजार रुपये लाचेची मागणी करीत आहेत. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने या लाच मागणीची पडताळणी 13 मार्च रोजी केली. त्यावेळी सुध्दा ग्रामसेवक शिंगणेने दहा हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आज दि.14 मार्च रोजी धर्माबाद येथील नरेंद्र चौकाजवळ ग्रामसेवक शिंगणेने दहा हजारांची लाच स्विकारताच त्याला जेरबंद करण्यात आले आहे. याबाबत बाचेगाव ता.धर्माबाद येथील ग्रामसेवक मुळ रा.आहित्यादेवीनगर चारवाडी ता.नायगावचे यादव गंगाराम शिंगणे (57) यांच्याविरुध्द धर्माबाद पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वृत्तलिहिपर्यंत सुरू होती. ही सापळा कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस राहुल खाडे, अपर पोलीस अधिक्षक धरमसिंग चव्हाण, पोलीस उपअधिक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधिक्षक प्रकाश वांद्रे , पोलीस निरिक्षक गजानन बोडके, पोलीस अंमलदार किशन चिंतोरे, हनमंत बोरकर, एकनाथ गंगातीर, शेख मुजीब, निळकंठ येमुनवाड यांनी पार पाडली.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही माहिती देतांना जनतेला आवाहन केले आहे की, कोणी शासकीय अधिकारी, कर्मचारी, शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असेल तसेच त्याच्या लाच मागणीचे मोबाईल फोनवर बोलणे असेल,ऑडीओ, व्हिडीओ असेल, एसएमएस असतील तसेच भ्रष्टाचार संबंधाने कांही माहिती असेल तसेच माहिती अधिकारात शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी शासकीय निधीचा भ्रष्टाचार केल्याची माहिती प्राप्त झाली असेल तर याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. त्यासाठी टोल फ्रि क्रमांक 1064(2), कार्यालयाचा फोन क्रमांक 02426-253512 यावर आणि पोलीस उपअधिक्षक राजेंद्र पाटील यांचा मोबाईल क्रमांक 7350197197 सुध्दा माहिती देता येईल तसेच एसीबी विभागाच्या शासकीय संकेतस्थळावर, मोबाईल ऍपवर आणि फेसबुक पेजवर सुध्दा याची माहिती देता येईल जनतेने भ्रष्टाचार रोखण्यासाठी ही माहिती द्यावी असे आवाहन एसीबी विभागाने केले आहे.