दंडाच्या रक्कमेतील 20 हजार रुपये फिर्यादीला देण्याचे आदेश
नांदेड(प्रतिनिधी)-सन 2009 मध्ये शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या मारहाण प्रकरणात सन 2015 मध्ये प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या शिक्षेत थोडासा बदल करून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी पिता-पुत्र आणि तिसऱ्या बंधूला शिक्षा दिली आहे.
प्रकाश घनशाम घोडजकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 10 एप्रिल 2009 रोजी रात्री 9.30 वाजता विश्र्वनाथ विठ्ठल वाघमारे (51), त्यांचा पुत्र केशव विश्र्वनाथ वाघमारे (28) आणि बंधू काशिनाथ विठ्ठलराव वाघमारे (56) यांनी त्यांना पैसे देण्या-घेण्याच्या कारणावरुन वाद घालून मारहाण केली.त्यावेळी न्यायालयात सात साक्षीदारांनी आपले जबाब नोंदवले होते. त्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयातील तत्कालीन न्यायाधीश एम.व्ही. चव्हाण यांनी विश्र्वनाथ वाघमारे, केशव वाघमारे आणि काशिनाथ वाघमारे यांना एक महिना सक्तमजुरी आणि प्रत्येकी 5 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली. या निर्णयाविरुध्द शिक्षा झालेल्या आरोपींनी जिल्हा न्यायालयात अपील क्रमांक 22/2015 दाखल केले.
या अपील प्रकरणाची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांच्यासमक्ष झाली. या प्रकरणात सरकार पक्षाच्यावतीने जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड. आशिष गोदमगावकर यांच्या मार्गदर्शना ऍड. बी.एम.हाके आणि ऍड.दिप्ती कुलकर्णी यांनी मांडली. या प्रकरणात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दिलेल्या शिक्षेतील कलम 326 बदलून 325 केले.विश्र्वनाथ विठ्ठलराव वाघमारे आणि काशिनाथ विठ्ठलराव वाघमारे या दोघांना कोर्ट उठेपर्यंत शिक्षा आणि दहा हजार रुपये रोख दंड तसेच केशव विश्र्वनाथ वाघमारे यास एक महिना सक्तमजुरी आणि 5 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली. दंडाच्या रक्कमेतील 20 हजार रुपये या प्रकरणाचे फिर्यादी प्रकाश घनशाम घोडजकर यांना देण्याचे आदेश दिले. शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक डॉ.नितीन काशीकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार नाथ कुलकर्णी यांनी पैरवी अधिकाऱ्याीच भुमिका बजावली.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिशांनी प्राथमिक शिक्षा बदलून तीन जणांना नवीन शिक्षा दिली