नांदेड(प्रतिनिधी)-मुखेड येथे एस.टी. चालकाने केलेल्या आत्महत्येला वेगळेच वळण लागले असून चालकाच्या बंधूने दिलेल्या तक्रारीवरुन एस.टी.चालकाच्या सासरच्या मंडळीविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त करणे या सदराखाली गुन्हा दाखल झाला आहे.
दि.21 मार्च रोजी सायंकाळी 5.30 वाजेच्यासुमारास येवती ता.मुखेड येथील कंधार फाटा मुखेड येथे रा.एस.टी.चालक गंगाधर मारोती येवतीकर (48) यांनी घरात गळफास घेवून आत्महत्या केली. एस.टी.विभागातील नेत्यांनी हा एस.टी.विभागातील गलथान कारभाराचा बळी असल्याचा कांगावा केला. यावेळी मयत गंगाधर यांचे वडील मारोती हे बरेच दुर होते. त्यांनी आल्यावर एस.टी.चालकाच्या मृत्यूला वेगळेच वळण आले.
एस.टी चालकाचे बंधू बळीराम मारोती मिरदोडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मयत एस.टी. चालक गंगाधर येवतीकरची पत्नी वैशाली, सासरे वसंत लोणीकर, मेहुणे गोविंद आणि परमेश्र्वर या सर्वांच्या शिवीगाळ करणे, थापडबुक्यांनी मारहाण करणे या मानसिक त्रासाला कंटाळूनच गंगाधर येवतीकरने विषारी औषध पिवून आत्महत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच प्रभारी पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे, मुखेडचे पोलीस निरिक्षक विलास गोबाडे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर आणि अनेक पोलीस अधिकारी, अंमलदारांनी गंगाधर येवतीकरच्या घडलेल्या प्रकाराला जाणून घेतले. मुखेड पेालीसांनी मयत गंगाधरची पत्नी वैशाली तिचे वडील आणि दोन भाऊ यांच्याविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 306, 323, 504, 406, 34 नुसार गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक पी.एस.काळे यांच्याकडे या प्रकरणाचा तपास देण्यात आला आहे.
मुखेड येथे एस.टी.चालकाची आत्महत्या घरगुती वादातून ; गुन्हा दाखल