नांदेड(प्रतिनिधी)-जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्याला कोंडून 50 हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्याविरुध्द वजिराबाद पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. खंडणीखोर मात्र पळून गेला.
जिल्हा परिषद बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता ओमप्रकाश वैजनाथ निला यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 23 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता ते आपल्या कार्यालयात असतांना मारोती बिच्चेवार रा.मुदखेड हा व्यक्ती तेथे आला आणि त्याने कार्यकारी अभियंता कक्षाचे दार ढगलून तुम्ही शिवाजी वारकडकडे उपअभियंता पदाचा कार्यभार का देत नाही म्हणून हुज्जत घातली. तुम्ही फक्त मंत्र्यांचेच ऐकता असे सांगून निला यांच्या हातातील शासकीय संचिका हिसकावून फेकून दिल्या. नांदेड जिल्ह्यात नोकरी करायची असेल तर मला 50 हजार रुपये द्या, तु कसा नोकरी करतोस असे सांगून कार्यकारी अभियंता कक्षाचा दरवाजा बंद करून घेवून त्याचा कडीकोंडा लावला. त्यावेळी बाहेर असलेले सेवक मन्मथ नरवाडे यांच्यासोबत धक्काबुक्की केली हा शासकीय कामात अडथळा होता.
घटना करून खंडणीखोर मारोती बिच्चेवार हा पळून गेला. वजिराबाद पोलीसांनी कार्यकारी अभियंता ओमप्रकाश वैजनाथ निला यांच्या तक्रारीवरुन गुन्हा क्रमांक 82/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 353, 332, 384, 342, 186, 504 आणि 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक गोविंद जाधव यांच्याकडे देण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेत कार्यकारी अभियंत्याला कोंडले; खंडणी मागीतली