पोलीस अंमलदार, पत्नी, मुलगी जखमी

नांदेड(प्रतिनिधी)-निझामकालीन वजिराबाद पोलीस ठाण्यात असलेल्या पोलीस वसाहतीतील दोन घरांवर जिल्हाधिकारी कार्यालयातील झाड पडल्याने एक पोलीस अंमलदार आणि त्यांच्या कुटूंबियांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. पोलीस ठाणे वजिराबाद आणि जिल्हाधिकारी कार्यालयादरम्यान असलेली सुरक्षाभिंत अनेक वर्षापुर्वी पडलेली आहे.
आज दि.27 मार्च रोजी दुपारी 12 वाजेच्यासुमारास जिल्हाधिकारी कार्यालयातून वाढलेले एक झाड पुर्व दिशेकडे कोसळले. पुर्व दिशेकडे समाप्त झालेली जिल्हाधिकारी कार्यालयाची भिंत आणि त्यानंतर पोलीस वसाहत आहे. झाड कोसळले तेंव्हा पोलीस वसाहतीतील घर क्रमांक 5 आणि 6 त्या झाडाच्या तावडीत सापडले आणि अपघात घडला. या घरांमध्ये क्रमांक 6 बंद आहे आणि 5 क्रमांकामध्ये वाहतुक शाखेतील पोलीस अंमलदार बळीराम धुमाळे आणि त्यांच्या कुटूंबियांचे वास्तव्य आहे. झाड पडल्यानंतर वर असलेल्या सिमेंट पत्र्यांना भगदाड पडले आणि घरातील सौ.धुमाळे आणि त्यांची मुलगी जखमी झाल्या आहेत. घरातील सामान, साहित्य अस्ताव्यस्त झाले. पोलीस वसाहत असल्याने त्वरीत प्रभावाने धुमाळे कुटूंबियांना रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ज्या भागातून हे झाड पोलीस वसाहतीवर कोसळले त्या भागात असलेली जिल्हाधिकारी कार्यालयाची सुरक्षा भिंत अगोदरच असंख्य वर्षापुर्वी पडली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय आणि वजिराबादमधील पोलीस वसाहत यांच्यामध्ये सहज येता जाता येते आणि सुरक्षा नावालाच आहे. ज्या भागात जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ही झाडे आहेत त्या भागाचा उपयोग होतच नाही. कांही भंगार साहित्य जिल्हाधिकारी कार्यालयात त्या भागात ठेवलेले आहे. कधी काळी या सुरक्षा भिंतीजवळच जिल्हाधिकारी कार्यालयाचे अभिलेख कक्ष होते. अजूनही या भागात बरीच अशी झाडे आहेत की जी कधी कोसळतील याचा कांही नेम नाही. सुदैवाने आज छोट्याशा दुखापतीवर धुमाळे कुटूंबियांचे निभावले आहे. पण घडलेला प्रकार पाहिला तर सुदैव म्हणण्याशिवाय त्याला पर्याय नाही अशी त्या भागातील परिस्थिती आहे. आता तरी उर्वरीत झाडांबद्दल एक निर्णय घेवून त्यावर अंमल झाला तर भविष्यातील असे अपघात टाळता येतील.
वजिराबाद पोलीस ठाण्यातील वसाहत ही निजामकालीन आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्ष होत आली. पण या पोलीस वसाहतीतील घरांच्या डाकडुजीशिवाय त्यांच्या सबळतेसाठी काहीच केले गेले नाही. काल परवाच नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी स्नेहनगर पोलीस कॉलनीबाबत विधी मंडळात प्रश्न उपस्थित केला होता. पण सध्या परिस्थितीत वजिराबाद पोलीस ठाण्यातील घरांची आवस्था अत्यंत वाईट आहे. त्या ठिकाणी मल्लनिसारण वाहिनी सुध्दा अनेकदा बंद होते. त्यातील घाण वास पोलीस अंमलदार आणि त्यांच्याकुटूंबियांना सोसावाच लागतो. मोठा पाऊस झाला तर वजिराबादच्या पोलीस वसाहतीत संपुर्ण पाणी साचते कारण पाणी निघून जाण्यासाठी नाल्याच नाहीत. अशा परिस्थितीत काम करणाऱ्या आणि त्या घरात राहणाऱ्या पोलीस अंमलदारांना सल्युटच करावा लागेल.
