नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी मारहाण झालेला जखमी आजही अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. सोबत इतर दोन जणांना सुध्दा मार लागलेला आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी त्याचा जबाब घेणे तर सोडाच त्याच्यावर दारु विक्रेत्याची तक्रार घेवून गुन्हा दाखल केला आहे. याबाबत कॉंगे्रस कार्यकर्ते रमेश गोडबोले यांनी नांदेड ग्रामीणच्या पोलीस निरिक्षकांना फोन केला तर ते उलट सुलट उत्तरे देत आहेत.
कॉंगे्रस कार्यकर्ते रमेश गोडबोले यांनी दिलेल्या माहितीनुसार दि.27 मार्च 2022 रोजी एका लग्न कार्यक्रमातील कांही युवकांचे ढवळे कॉर्नरवर असलेल्या दारु दुकानात भांडण झाले. हे भांडण अरविंद हटकर यांनी पाहिले. भांडण सोडविण्यासाठी ते मध्ये गेले असतांना दारु दुकानातील लोकांनी अरविंद हटकर, लखन जोंधळे आणि अमोल कांबळे यांना मारहाण केली. त्यात अरविंद हटकर यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यांच्यावर सध्या खाजगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दवाखान्याने त्याच दिवशी 27 मार्च रोजीच एमएलसीची माहिती पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथे पाठविली असल्याचे रमेश गोडबोले यांनी सांगितले. तरी आज 30 मार्चपर्यंत त्या जखमीचा साधा जबाब सुध्दा घेण्यात आलेला नाही. या संदर्भाने रमेश गोडबोले यांनी नांदेड ग्रामीणचे कर्तव्यदक्ष, कर्दनकाळ, आदरणीय, सन्माननिय, तोंडी आदेशाने एक वर्षापेक्षा जास्त नांदेड ग्रामीणमध्ये कार्यरत असलेले पोलीस निरिक्षक श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब यांना फोन करून विनंती केली की, जखमीचा जबाब घ्या. तेंव्हा रमेश गोडबोले सांगतात की, घोरबांड साहेब म्हणत आहेत की, तुम्ही सीसीटीव्ही फुटेज पाहिले काय?, त्यांनाच मारहाण झाली आहे मी तर हटकर विरुध्द 307 चा गुन्हा दाखल करणार होतो. परंतू छोटीशी केस करून सोडले आहे. रमेश गोडबोले सांगतात अशा पध्दतीची वागणूक असते काय? अरविंद हटकर जखमी आहेत त्यांचा जबाब घेतला पाहिजे. त्यानंतर भारतीय प्रक्रिया संहितेला अपेक्षीत कायदेशीर कार्यवाही केली पाहिजे. पण श्री अशोकरावजी घोरबांड साहेब कांहीच प्रतिसाद देत नाहीत त्यामुळे पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे आल्याबरोबर आम्ही त्यांना भेटणार आहोत आणि आपली व्यथा मांडणार आहोत असे रमेश गोडबोले सांगत होते.
ऍड.आगाशेच्या तक्रारीवरुन घोरबांड साहेबांना मुंबई वारी
ऍड.अनुप आगाशे यांना दिवसभर पोलीस ठाण्यात बसवून त्यांच्यावर अन्याय केल्याप्रकरणी ऍड.अनुप आगाशे यांनी मानवी हक्क आयोगाकडे पोलीस निरिक्षक श्री अशोकरावजी घोरबांड यांची तक्रार केली होती. या संदर्भाने आज दि.30 मार्च रोजी मानवी हक्क आयोगाने पोलीस निरिक्षक श्री.अशोकरावजी घोरबांड यांना पाचारण केले आहे. काल दि.29 मार्च रोजी आपल्या पोलीस ठाण्यात कायदेशीर नोंदींचा सोपस्कार पुर्ण करून घोरबांड साहेब मुंबईला रवाना झालेले आहेत. ऍड. अनुप आगाशे आज जावू शकले नाहीत म्हणून मानवी हक्क आयोगाची तारीख पुढे वाढवून घेण्यात येणार आहे असे ऍड. अनुप आगाशे यांनी सांगितले.
अतिदक्षता विभागातील जखमीचा जबाब घेण्याचे औदार्य नांदेड ग्रामीण पोलीस दाखवत नाहीत