दोन महिलांसह सहा आरोपींना सक्तमजुरी आणि प्रत्येकाला 12 हजार असा एकूण 72 हजार रुपये रोख दंड

दंडाच्या रक्कमेतील 20 हजार रुपये मारहाण झालेल्या व्यक्तीला मिळणार
नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या बहिणीला बोलण्यास प्रतिबंध केला म्हणून दोन महिलांसह सहा जणांनी त्याला केलेल्या मारहाणीचा निकाल देतांना चौथ्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन.एल.गायकवाड यांनी 6 आरोपींना भारतीय दंडसंहितेच्या कांही कलमांनुसार एक वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकाला एकूण 12 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. दंडाच्या रक्कमेतील 20 हजार रुपये रक्कम मारहाण झालेल्या पिडीताला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
9 फेबु्रवारी 2020 रोजी सकाळी 9.30 वाजता गणेशसिंह अमरसिंह ठाकूरने सुरज मनोहर खिराडे यास आपल्या बहिणीला न बोलण्याबदल समज दिली. त्यानंतर 10 फेबु्रवारी 2020 रोजी सकाळी 9 वाजेच्यासुमारास गणेशसिंह ठाकूर हा आपल्या पान शॉप दुकानाकडे जाण्यासाठी निघाला असतांना सुरज खिराडेने त्यास थांबवले. हा घटनाक्रम गुरूनगर भागात घडला. याच भागात गणेशसिंह ठाकूर आणि सुरज खिराडेची घरे आहेत. सुरज खिराडेने गणेशसिंहला शिव्या द्यायला सुरूवात केली तेंव्हा दोन महिला आणि चार पुरूष असे पाच जण अजून आले आणि सर्वांनी लाकडाच्या दांड्याने गणेशसिंह ठाकूरला भरपूर चोप दिला.सोबतच त्याची महागडी दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.एल.6901 ही लाकडी दांडक्यांनी फोडली. त्यानंतर गुरूनगर भागातील कांही लोकांनी गणेशसिंह ठाकूरला पोलीस ठाणे विमानतळ येथे नेले. पोलीसांनी त्याला अगोदर उपचारासाठी पाठवले आणि उपचारानंतर त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा क्रमांक 49/2020 भारतीय दंड संहितेच्या कलम 326, 354, 143, 145, 148, 149, 427 प्रमाणे दाखल केला. या गुन्ह्यात आरोपीच्या सदरात सुरज मनोहर खिराडे (23), मंगेश मनोहर खिराडे (25), देवराव वामनराव पाईकराव (45), वंदना मनोहर खिराडे (48), अनिता उर्फ मंदा अनिल आठवले (40), बाबूराव वामनराव पाईकराव(42) अशा सहा जणांची नावे होती. या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस उपअधिक्षक अभिजित तानाजी फस्के (धाराशिवकर) यांनी केला. या सर्व आरोपींना अटक करून सखोल तपास, अनेक कागदपत्रांची जुळवाजुळव झाल्यानंतर अभिजित फस्के यांनी सहा जणांविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
न्यायालयात या सहा जणांच्या खटल्याचा क्रमांक नियमित फौजदारी खटला क्रमांक 602/2020 असा होता. या खटल्यादरम्यान न्यायालयाने उपस्थित केलेल्या विविध मुद्यांमध्ये कांही मुद्ये सिध्द झाले आणि कांही झाले नाही. खटल्यादरम्यान दोन डॉक्टर, चार पंच, फिर्यादी, तीन घटना पाहणारे साक्षीदार आणि तपासीक अंमलदार अभिजित फस्के अशा 10 जणांनी आपले जबाब न्यायालयासमक्ष नोंदवले. या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने ऍड. व्ही.बी.तोटवाड यांनी मांडली आरोपींच्यावतीने ऍड.एस.एन.ढोले यांनी काम पाहिले.
आपल्या 31 पानी निकाल पत्रात कायद्याचा उहापोह करत न्यायाधीश एन.एल.गायकवाड यांनी भरपूर मुद्यांचे विवेचन करत हा निकाल दिला. निकालाप्रमाणे सुरज मनोहर खिराडे (23), मंगेश मनोहर खिराडे (25), देवराव वामनराव पाईकराव (45), वंदना मनोहर खिराडे (48), अनिता उर्फ मंदा अनिल आठवले (40), बाबूराव वामनराव पाईकराव(42) या सहा जणांना न्यायालयाने भारतीय दंड संहितेच्या कलम 326 आणि 149 नुसार एक वर्ष सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये रोख दंड, तसेच कलम 148 आणि 149 नुसार सहा महिने सक्तमजुरी आणि 1 हजार रुपये दंड, सोबत कलम 427 सह 149 नुसार सहा महिने सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंड अशा शिक्षा ठोठावल्या. या सर्व शिक्षा आरोपींना एकत्रीत भोगाच्या आहेत. प्रत्येक आरोपीला एकूण 12 हजार रुपये दंड असा एकूण सहा आरोपींना मिळून 72 हजार रुपये दंड होतो. या खटल्यादरम्यान विमानतळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संजय ननवरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक बाबा गजभारे, तुरेराव, कुरूळेकर, पोलीस अंमलदार पावडे, नागरगोजे यांनी भरपूर मेहनत घेतली. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलीस अंमलदार रामदास सुर्यवंशी यांनी परिश्रम केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *