बेघर पत्रकारांच्या सोसायटीत वेगवेगळ्या पत्रांमुळे आणि बदलेल्या नावांचा मोठा घोळ

नांदेड(प्रतिनिधी)-बेघर पत्रकारांच्या सोसायटीमध्ये 1981 या वर्षात या बेघर पत्रकारांच्या सोसायटीचे नाव पत्रकार नगर सहकारी गृहनिर्माण संस्था होते. 1981 ला त्याचे नाव बदलून पत्रकार सहवास को.ऑप.हाऊसिंग सोसायटी असे करण्यात आले ही माहिती उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयातून माहिती मिळावल्यानंतर पुढे आली आहे. यावरून या पत्रकार सोसायटीने किती कामे केली याचा कांही उलगडा होत नाही. या सर्व बाबी अलादीनच्या चिमणीसारख्या आहेत.
उपनिबंधक कार्यालय सहकारी संस्था या कार्यालयातून प्राप्त झालेल्या माहितीमध्ये अनेक अजब बाबी समोर आल्या आहेत. ज्यामध्ये नियोजित पत्रकार नगर सहकारी गृहनिर्माण संस्था द्वारा दैनिक श्रमीक एकजुट कार्यालय गांधी पुतळा अशा लेटरहेडवर एक पत्र प्राप्त झाले त्यात नाव बदलल्याचे प्रकरण लिहिलेले आहे. या ठरावाचे सुचक आदरनिय पत्रकार प्रभाकर रावके होते आणि अनुमादक कृष्णा शेवडीकर आहेत. 1981 मध्ये असलेल्या जिल्हाधिकारी रामानंद तिवारी यांनी पत्रकार नगर सोसायटीला पाठविलेल्या एका पत्रानुसार तुमची सोसायटी नोंदणीकृत असावी असे लिहिले आहे. याच संचिकेत संस्थेसाठी कोणती जागा मिळणार आहे हे निश्चित ठरले नसल्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सादर करता येत नाही. जागा उपलब्ध होताच प्रमाणपत्र सादर करण्यात येईल असेही एक पत्र आहे. या पत्रावर वापरलेल्या लेटरहेडमध्ये नगर हा शब्द खोडून त्यावर सहवास शब्द हाताने लिहिलेला आहे.
अशा प्रकारे नाव बदलल्यानंतर पत्रकार सहवास को.ऑ.हाऊसिंग सोसायटीचे प्रमाणपत्र सहाय्यक निबंधक बी.आर.नपाते यांनी 12 मार्च 1981 मध्ये निर्गमित केलेले आहे. त्यावेळच्या सोसायटीमध्ये 14 नावे लिहिलेली आहेत. त्यात प्रभाकर नानासाहेब रावके, कृष्णा चंदिदासराव शेवडीकर, भगवान रामराव कुलकर्णी, संजय धोंडीबा मांजरमकर, रविंद्र देविदासराव रसाळ, जयंत गोपाळराव कुर्तडीकर, अहमद अब्बास चुगताई, बसवंते, मारोतीराव किशनराव, कमलाकर रामदेव जोशी, मोहम्मद सत्तर आरेफ, रामकृष्ण गुंडेवार, अर्जुन इंगोले आणि प्रतिभा रसाळ अशी नावे प्रर्वतक म्हणून लिहिलेली आहेत. आजच्या परिस्थितीत यातील किती नावे त्या संस्थेचे सदस्य आहेत हा एक मोठा शोध विषय आहे.
नोंदणी झाल्यानंतर 1987 मध्ये संस्थेच्या नोंदणीची प्रत मागण्यात आली होती. हे पत्र तत्कालीन सरचिटणीस कृष्णा शेवडीकर यांनी दिलेले आहे. दि.23 फेबु्रवारी 1993 रोजी उपनिबंधक सहकारी संस्था यांनी कृष्णा शेवडीकर, सचिव पत्रकार सहवास सोसायटीला लिहिलेल्या पत्रानुसार संस्थेच्या निवडणुका घेण्यात आलेल्या नाहीत, सभासदांना घरे बांधून देण्याबाबत माहिती सादर केलेली नाही. संस्थेच्या कोणत्याही व्यवहाराची माहिती दिलेली नाही. ती माहिती विहित दिवसांमध्ये सादर करावी नसता महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व 1961 मधील तरतूदीनुसार कार्यवाही अंमलात आणली जाईल याची नोंद ठेवण्याची सुचना या पत्रात करण्यात आली आहे. 23 फेबु्रवारी 1993 च्या पत्रात कृष्णा शेवडीकर उपनिबंधकांना लिहितात की, आमच्या संस्थेतील पदाधिकाऱ्यांमध्ये कोणतेही बदल झालेले नाहीत. पण कांही जण आपण संस्थेचे पदाधिकारी असल्याबाबत भास निर्माण करून कांही कार्यालयांच्या अधिकाऱ्यांची दिशाभुल करीत आहेत याची नोंद घेवून कार्यवाही करा असे लिहिलेले आहे. उपनिबंधक कार्यालयाने 19 मार्च 1993 रोजी मुख्याधिकारी नगरपालिका नांदेड यांना पत्रकार सहवास सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची यादी आणि पत्ता विचारलेला आहे. पण त्याचे उत्तर या संचिकेत जोडलेले नाही.
17 सप्टेंबर 1993 रोजी उपनिबंधक सहकारी संस्था यांनी बेघर पत्रकारांच्या सोसायटीचे तत्कालीन अध्यक्ष भगवानराव कुलकर्णी यांना विचारणा केली आहे की, नवीन बैठकीत सचिव पदावर कमलाकर जोशी यांचे नाव का लिहिलेले आहे. कृष्णा शेवडीकर सचिव असतांना सचिव बदलण्याचे प्रयोजन काय आहे. पण याचे उत्तर या संचिकेत सापडलेले नाही. आजच्या परिस्थितीत पदाधिकारी कोण आहेत हे कळत नसले तरी सर्व कारभार एकाच व्यक्तीच्या हातात आहे असे जाणवते. यामुळे आयत्या बिळावर नागोबा असा प्रकार या खळीपडणाऱ्याने केला दिसतो आहे.
या सोसायटीच्या कागदपत्रांमध्ये एक मृत्यूपत्र आहे त्यात मयत महिला आहे त्यांचे नाव कुशावरताबाई आणि त्यांच्या पतीचे नाव गोविंदराव हरबळे असे लिहिलेले आहे. या दोन्ही नावांचा उल्लेख संचिकेत इतर कोणत्याही कागदपत्रात दिसत नाही. संस्थेच्या उपविधी दुरूस्ती करण्यात आला आहे. त्या पोट नियम 1 ते 73 च्या नोंदीमध्ये नियम क्रमांक 97 ची दुरूस्ती लिहिलेली आहे. ते 97 क्रमांकाचा नियम कोणता आहे आणि सुधारीत उपविधी कोणती आहे ती कागदपत्रे मात्र या संचिकेत उपलब्ध नाहीत. दि.28 एप्रिल 2013 चा एक सर्वसाधारण सभेचा ठराव यात जोडलेला आहे. त्यात एकूण 28 सदस्यांची नावे आहेत. 1983 च्या यादीतील आणि 2013 च्या यादीतील नावांमध्ये एवढा फरक आहे की, त्या नावांची जोडणी करतांना नाकीनऊ आले आहेत. कधी प्रभाकर रावके यांचे नाव क्रमांक 1 वर असाचे तर ते नाव सन 2013 मध्ये क्रमांक 5 वर लिहिलेले आहे. 1983मधील यादीच्या तुलनेत बहुतांश नावे नवीन आहेत आणि बहुदा यासाठीच हा उपविधी बदलण्यात आला असेल असे दिसते. या कागदपत्रांमध्ये उपविधीजोडलेला आहे. पण त्यात नियम 97 कुठेच दिसत नाही अशा प्रकारे या बेघर पत्रकारांनी केलेला भुखंडांचे खेळ आता महानगरपालिकेच्या कक्षेतील कार्यवाहीचा भाग आहे. पण अद्याप तरी महानगरपालिकेच्या कोणत्याही अधिकाऱ्याने यावर कार्यवाही करण्याची हिंम्मत दाखवलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *