गॅस कटरने एटीएम कापून चोरी केल्याच्या संशयातील तिघांना पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-जुलै 2021 मध्ये अर्धापूर येथील एटीएम फोडून 31 लाख 7 हजार रुपये चोरी करण्याच्या संशयातील तीन जणांना मध्यप्रदेश पोलीसांनी पकडल्यानंतर अर्धापूर पोलीसांनी त्यांना हस्तांतरण वॉरंटवर अर्धापूरला आणले. या तीन जणांना अर्धापूर न्यायालयाने 7 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दि.29 जुलै 2021 रोजी अर्धापूर शहरात बसवेश्र्वर चौकातील एसबीआयचे एटीएम कटर मशीनने कापून त्यातील 31 लाख 7 हजार रुपये अशी मोठी चोरी झाली होती. या प्रकरणी त्यावेळी गुन्हा क्रमांक 167/2021 दाखल करण्यात आला होता. दरम्यान मध्यप्रदेश पोलीसांनी हरीयाणा राज्यातील कांही लोकांना तेथे पकडले आणि त्यांनी ही माहिती अर्धापूर पोलीसांनी दिली की, हेच ते चोरटे आहे ज्यांनी 29 जुलै रोजी अर्धापूर येथे एटीएम गॅस कटरने फोडले होते.
पोलीस निरिक्षक अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक मोहम्मद तयब, पोलीस अंमलदार सतिश लहानकर, संदीप पाटील, कल्याण पांडे, महेंद्र डांगे आदींनी हस्तांतरण वॉरंटवर तेथून ईरशाद आस मोहम्मद मेवाती (36), सलीम हसन मोहम्मद मेवाती (26) आणि मुस्ताक ईस्लाम मेवाती (43) या हरियाणा राज्यातील तिघांना अर्धापूरला आणले. अर्धापूर न्यायालयाने या तिन जणांना 7 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *