भारताच्या संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर

भारताच्या पावन भूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांच्या सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशा दर्शक ठरलेला आहे. अशा या थोर महापुरुषांपैकी एक म्हणजे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर होत.

डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते.यांनी सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध समाज विकासाच्या क्षेत्रात कार्य केले. त्यापैकी एक सर्वोच्च कार्य म्हणजे *भारताचे संविधान* या पुस्तकाचे लिखाण!!!

अनेक शब्दांना एकत्र करून… एका वाक्यात *भारताचे संविधान हे, उद्देशिकेच्या* रूपात लिहिण्याचे अद्भुत कार्य करणाऱ्या आणि याच एका वाक्यापासून भारत देशाला अखंड निर्माण करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समंजस, विद्वान,अभ्यासू व विचारवंत आहेत हे पटल्यामुळे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल आणि महात्मा गांधी यांनी आंबेडकरांना स्वतंत्र भारताचे पहिले विधिमंत्री केले होते आणि घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष केले होते. म्हणून डॉ.आंबेडकरांनी घटना समितीच्या कार्याचा शुभारंभ 30 ऑगस्ट 1947 पासूनच केला होता. त्यांच्यासोबतच्या 7 सहकार्‍यांची मिळेल तशी साथ घेत घटनेचा मसुदा ( भारताचे संविधान) *2 वर्ष 11 महिने 18 दिवसात* लिहून वेळेत तयार केला. ज्यामध्ये मसुदा रूपातील घटनेचे अठरा भाग होते या 18 भागात 315 कलमे (सध्याची 395)आणि 9 परिशिष्टे होती. *145000* शब्दापासून तयार झालेला,,,

आपल्या देशातील सर्वोच्च आणि चांगला ग्रंथ म्हणजे भारताचे संविधान होय.

कोणत्याही देशाचे संविधान हे त्या देशाच्या राज्यकारभाराची पद्धती, देशाचे कायदे-कानून व नियमावली चे पुस्तक असते.*

संविधान हा राष्ट्राचा आत्मा असतो. म्हणून आपल्या राष्ट्राला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली *आत्मा रुपी संविधान* ही सर्वात मोठी देणगी आहे.

घटनेची उद्देशिका म्हणजेच संविधान होय.

भारताचे संविधान या पुस्तकाची *उद्देशिका* ही अभ्यासक्रमातील प्रत्येक पाठ्यपुस्तकात पहिल्या पानावर दिलेली आहे.

या उद्देशिकेतला एकेक शब्द अनमोल आहे व आपल्या संस्कृतीचा वारसा आहे.

संविधानाच्या उद्देशिकेचा अर्थ म्हणजे,,,, आम्ही भारताचे लोक म्हणजे आपण स्वतः,, भारताचे एक सार्वभौम म्हणजे उच्च स्तरावरचा,एकमेव देश जो अनेक समाज समूह एकत्रित घेऊन पुढे जाणारा म्हणजे *समाजवादी,* सर्वधर्मसमभाव असलेला म्हणजे *धर्मनिरपेक्ष*, आणि *लोकशाही* असलेला आणि *गणराज्य* म्हणजे असे लोक ज्यांना स्वतःच्या अस्तित्वा सोबत शासन आणि प्रशासनाची जाणीव असते… असा समाज घडवायचा आहे ((समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे दोन शब्द 1976 साली, पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 42 व्या घटनादुरुस्ती मध्ये घेतले गेले आहेत))….व सर्व नागरिकास समान, सारखा *सामाजिक ,,आर्थिक व राजनैतिक न्याय* मिळवून द्यायचा आहे….. त्यासोबतच प्रत्येक नागरिकास *विचारांचं, अभिव्यक्तीचं, विश्वासाचं, श्रद्धेचं व उपासनेच* स्वातंत्र्य द्यायचे आहे…. आणि घटना आपल्याला दोन गोष्टींची *समानता* देते ती म्हणजे दर्जाची आणि संधीची*… प्रत्येक व्यक्तीला समान दर्जा मिळावा व प्रत्येकाला समान संधी मिळाली पाहिजे… घटनेने आपल्याला तीन प्रकारची आश्वासने दिली आहेत व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि एकात्मता म्हणजेच आश्वासनाची जबाबदारी जनतेवरच असेल….म्हणजेच बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करायचा आहे…. ही संविधानाची उद्देशिका स्वतः अंगीकृत करायची आहे म्हणजे स्वीकारायची आहे आणि अधिनियमित म्हणजे स्वतःला शिस्त लावून घ्यायची आहे म्हणजेच आत्मसमर्पण करायचं आहे.

संविधानाच्या उद्देशिके प्रमाणे देशात सर्वश्रेष्ठ म्हणजे आम्ही भारताचे लोक आहोत…..

भारताचा हा सर्वोत्कृष्ट ग्रंथ 26 नोव्हेंबर 1949 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या कडे स्वाधीन केला. त्याप्रसंगी डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी डॉ. आंबेडकरांचा गौरव केला, सन्मान केला आणि यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले ते असे “स्वतंत्र भारताच्या मसुदा समितीचे सभासद आणि अध्यक्ष म्हणून आम्ही केलेल्या निवडीचा निर्णय अचूक होता आणि डॉ. आंबेडकरांनी उत्कृष्ट राज्यघटनेची निर्मिती करून तो निर्णय सार्थक सिद्ध केला आहे.”

आणि म्हणून डॉ.भीमराव आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे श्रेष्ठ शिल्पकार आणि जगातले एक महान घटनाकार म्हणून सिद्ध झाले.26 जानेवारी 1950 पासून संविधान अमलात आणले म्हणून आपण हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो.

आज आम्ही महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहोत त्याचे श्रेय डॉ. आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाला जाते हे विनम्रपणे सांगू इच्छिते.

तळागाळातल्या प्रत्येक व्यक्ती साठी कार्य करणाऱ्या महामानवाला जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम आणि त्यांच्या कार्याची थोडीशी तोंडओळख करून,,, खरे अभिवादन.

-प्रा.सौ.सरोज संजय पाटील शेळगावकर

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *