
नांदेड(प्रतिनिधी)-बांधकाम व्यवसायीक संजय बियाणी यांच्या खून प्रकरणातील मारेकऱ्यांचा मागील 9 दिवसात कांही एक शोध लागला नाही. पण बियाणीच्या घरी आलेल्या बनावट आणि बोगस पत्राचा शोध लावण्यात विशेष तपास पथकाला 48 तासात मोठे यश आले आहे. एसआयटीने बोगस पत्र पाठविणाऱ्याला जेरबंद केले आहे.
दि.5 एप्रिल रोजी शहरातील बांधकाम व्यवसायीक संजय बियाणी यांच्या निवासस्थानासमोर त्यांच्यावर दोन अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून त्यांचा खून केला होता. या गुन्ह्याच्या तपासासाठी अत्यंत विद्वान् अपर पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांच्या सक्षम नेतृत्वात एसआयटी (विशेष तपास पथक) स्थापन करण्यात आले. आज बियाणी यांच्या हत्येला 9 वा दिवस आहे. हल्लेखोरांचा अद्याप कांही एक शोध लागलेला नाही. कांही लोकांच्या सांगण्यावरून एका व्यक्तीच्या आसपास हा खून प्रकरणाचा तपास गोल-गोल भवऱ्यासारखा फिरत आहे.
दरम्यान 11 एप्रिल रोजी संजय बियाणी यांच्या घरी एक निनावी पत्र आले. त्यात संजय बियाणी यांच्या हत्येचा कट परभणीत रचला होता. तेथे पांडूरंग येवले हा परभणी येथील आनंद नगर मध्ये राहणारा एक मोठा दादा आहे. अटाळा ता.बिलोली येथील तो रेती माफिया आहे. परभणीत कोणताही बिल्डर शिल्लक राहणार नाही म्हणून बियाणीला खून करण्याचे खलबत रचण्यात आले होते असे या पत्रात लिहिले होते. हे निनावी पत्र बियाणी कुटूंबियांनी एसआयटीकडे दिले.
बियाणी हत्येच्या संदर्भात कोणताही तपास पुर्णत्वाकडे गेला नाही. पण या बनावट आणि बोगस निनावी पत्राचा छडा एसआयटीने अगदी जोरदारपणे मेहनत घेवून फक्त 48 तासात लावला. पत्र पाठवणारा व्यक्ती विठ्ठल संतराम सूर्यवंशी (74) रा.अटाळा ता.धर्माबाद हा आहे. आपल्या शेतीच्या वादातून त्याने पांडूरंग येवले यांचे नाव लिहुन हे पत्र लिहिले होते. पांडूरंग येवलेला बियाणीच्या खून प्रकरणात अटक व्हावी असा दुष्ट हेतू विठ्ठल सूर्यवंशीचा होता. एसआयटीच्या 48 तासातील भक्कम यशानंतर विमानतळचे पोलीस उप निरिक्षक प्रदीप भानुदास गौंड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार विठ्ठल संतराम सूर्यवंशी विरुध्द गुन्हा क्रमांक 130/2022 दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात भारतीय दंड संहितेची कलमे 419, 182, 192 जोडण्यात आली आहे. विठ्ठल संतराम सूर्यवंशीला विमानतळ पोलीसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस निरिक्षक अनिरुध्द काकडे यांच्याकडे देण्यात आला आहे.
पोलीस विभागाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी पाठवलेल्या प्रेसनोटनुसार ही कार्यवाही पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांच्या मार्गदर्शनात भोकरचे अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, विमानतळचे पोलीस निरिक्षक अनिरुध्द काकडे, पोलीस उपनिरिक्षक प्रदीप गौंड आणि पोलीस उपनिरिक्षक शिवसांब घेवारे यांनी केली आहे.
