नांदेड(प्रतिनिधी)-अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे यांनी उशीरा रात्रीपर्यंत रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना तपासणी करून तसे न करण्याबाबत अनेक जणांना समज दिली. हा प्रकार नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमलात आला.
अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे यांच्या सोबत नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे अत्यंत कर्तबगार, तोंडी आदेशाने एकवर्षापेक्षा जास्त नांदेड ग्रामीण ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस निरिक्षक श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब आणि अनेक पोलीस अंमलदारांनी सिडको परिसरातील धनेगाव वळण रस्ता, चंदासिंग कॉर्नर, सिडको-हडको भागात पथसंचलन करून रात्री उशीरा रस्त्यावर फिरणाऱ्या, बसून शितपेय पिणाऱ्या लोकांना चांगलीच समज दिली. यावेळी या भागातून जाणाऱ्या-येणाऱ्या गाड्यांची तपासणीही करण्यात आली.
एवढे मोठे अधिकारी पायी फिरत असतांना मात्र ढवळे कॉर्नरच्या विरुध्द दिशेला ज्या ठिकाणी आम्लेटचे गाडे लागतात त्याच्या पाठीमागे बेकायदेशीर रित्या सुरू असलेला बायोडिझेलचा पंप दिसला नाही. किंवा तो न दिसेल अशी सोय अगोदरपासूनच करण्यात आली की काय असे वाटायला लागले आहे. तरीपण अप्पर पोलीस अधिक्षक निलेश मोरे आणि पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे यांनी केलेली ही कार्यवाही गुन्हेगारांवर वचक निर्माण करणारी आहे.
