नांदेड(प्रतिनिधी)-महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणूकीत सिडको परिसरात हल्ला करून एका युवकाचा खून आणि एका युवकावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या दोन जणांना पकडल्यानंतर विशेष न्यायालयाने त्यांना 19 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
बळीरामपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक सुरू झाल्यानंतर रात्री 9 वाजेच्यासुमारास ही मिरवणूक नाईक कॉलेजसमोर आली असतांना तेथे डी.जे.च्या तालावर नाचता-नाचता आपसात विरोध झाला. या विरोधात बळीरामपूर येथील युवक सचिन उर्फ बंटी थोरातने किशोर ठाकूर आणि शेख आदील या दोघांना तुम्ही मिरवणूकीबाहेर जा असे सांगितले. हा वाद जवळपास एक तासापासून सुरू होता. त्या ठिकाणी कोणीही पोलीस हजर नव्हते आणि वाद वाढतच गेला. अखेर किशोर ठाकूरने आपल्याकडील चाकु काढून सचिन उर्फ बंटी थोरातच्या शरीरावर अनेक वार केले त्यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात त्याच ठिकाणी खालीपडला आणि मरण पावला. त्याला वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुमेध उर्फ बाळा राजू वाघमारे यालाही भरूपर मार लागला आहे. सध्या तो शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे.
15 एप्रिलच्या रात्री 3 वाजता या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद क्रमांक 4 नुसार गुन्हा क्रमांक 233/2022 दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात भारतीय दंड संहितेची कलमे 302, 307, 34 सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 च्या कलम 3 (2) (व्ही.ए.) जोडण्यात आल्या. या गुन्ह्याचा तपास इतवारा उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे यांच्याकडे देण्यात आला.
घडलेला प्रकार अत्यंत गंभीरच होता. त्यानुसार डॉ.सिध्देश्र्वर भोरे आणि त्यांच्या पथकाने त्वरीतप्रभावाने मेहनत घेवून बळीरामपूरमध्येच राहणारे हल्लेखोर किशोर ठाकूर आणि शेख आदील या दोघांना पकडले. 15 तारखेची पहाट झाल्यावर या दोघांना विशेष न्यायालयासमक्ष हजर करून पोलीस कोठडी मागण्यात आली ती न्यायालयाने चार दिवसासाठी अर्थात 19 एप्रिल 2022 पर्यंत मंजुर केली आहे. या हल्यात मयत झालेल्या सचिन उर्फ बंटी थोरातवर 15 एप्रिलच्या दुपारी 3 वाजता अत्यंत शोकाकुल वातावरणात सिडको येथील स्मशानभुमीत अंतिमसंस्कार करण्यात आले.
संबंधीत बातमी
https://vastavnewslive.com/2022/04/15/डॉ-बाबासाहेब-आंबेडकर-जयं-3/