नांदेड(प्रतिनिधी)-महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणूकीत विहित आवाजापेक्षा मोठ्या आवाजात वाजविण्यात आलेले 5 डी.जे. शिवाजीनगर पोलीसांनी ताब्यात घेतले आहेत. सोबतच दोन युवकांसह दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांकडून शिवाजीनगर पोलीसांनी घातक हत्यारे जप्त केली आहेत. चार स्वतंत्र चार गुन्हे भारतीय हत्यार कायद्यानुसार दाखल करण्यात आले आहेत.
14 एप्रिल रोजी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी शहरातून असंख्य मिरवणूक काढण्यात आल्या होत्या. या मिरवणूकीमध्ये डी.जे.चा वापर करण्यात आला होता. डी.जे.वाजवितांना त्याला 60 डेसीबलपेक्षा जास्त आवाजन न वाजविण्याचे नियम आहेत. मिरवणूका वजिराबाद चौकापर्यंत आल्यानंतर डी.जे.च्या विहित आवाजापेक्षा जास्त मोठ्या आवाजात वाजविण्यात आलेले पाच डी.जे.शिवाजीनगर पोलीसांनी ताब्यात घेतले आहेत. तसेच दिलीप शाम उदारे (21) आणि कपील सुधाकर कांबळे (28) या दोन युवकांसह दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांकडून घातक हत्यारे जप्त करण्यात आली. या चौघांविरुध्द भारतीय हत्यार कायद्यान्वये चार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक डॉ.नितीन काशीकर, सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे, पुणे, पोलीस उपनिरिक्षक रोडे, पोलीस अंमलदार दिलीप राठोड यांच्यासह इतर पोलीस अंमलदारांनी ही कार्यवाही केली. मिरवणूकीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेला लक्षात ठेवून केलेल्या या कार्यवाहीसाठी पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे यांनी शिवाजीनगर पोलीसांनी कौतुक केले आहे.
शिवाजीनगर पोलीसांनी पाच डीजे ताब्यात घेतले; दोन युवक आणि दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांकडून हत्यारे पकडली