नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका स्थापन होवून 25 वर्ष पुर्ण झालेल्या रौप्यमहोत्सव -2022 आयोजन करण्यात आल्याची माहिती महापौर जयश्री पावडे यांनी दिली. या कार्यक्रमांमध्ये जीवन गौरव पुरस्कार, चला हवा येवू द्या हा हास्यविनोद कार्यक्रम, हिंदी हास्य कवी संमेलन आणि आदर्श शिंदे यांचा भिमगितांचा कार्यक्रम आयोजित होणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमात डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या नावाने पद्मश्री डॉ.रमण गंगाखेडकर यांना जीवन गौरव पुरस्कार दिला जाणार आहे.
महानगरपालिकेच्यावतीने बोलविण्यात आलेल्या आजच्या पत्रकार परिषदेत महापौर जयश्री पावडे, आ.अमरनाथ राजूरकर, आ.मोहन हंबर्डे, माजी मंत्री डी.पी.सावंत, सभागृह नेता ऍड.महेश कनकदंडे, उपमहापौर अब्दुल गफार, सभापती किशोर स्वामी, अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब मनोहरे, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त पंजाबराव खानसोडे, आनंद चव्हाण यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलतांना जयश्री पावडे यांनी सांगितले की, महाराष्ट्रात नांदेडच्या संस्कृतीचे वैभव ज्ञात आहे. महानगरपालिकेची स्थापना 26 मार्च 1997 रोजी झाली. त्याला आता 25 वर्ष पुर्ण झाली आहेत. यानिमित्ताने पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या संकल्पनेतून रौप्यमहोत्सव 2022 साजरा करण्याचे ठरले. त्यात मराठवाडा विभागातील कला, क्रिडा, आरोग्य, प्रशासन, समाजसेवा, राजकारण, साहित्य, पत्रकारीता, संगीत, उद्योग, समाजप्रबोधन या क्षेत्रातून जीवन गौरव पुरस्कारासाठी एका व्यक्तीचे निवड ठरली होती. त्यात पद्मश्री डॉ.रमण गंगाखेडकर यांची निवड यांची निवड झाली. त्यांनी कोविड काळातील केलेल्या संशोधनात त्यांचे नाव जगभर गाजले आहे. त्यांना या पुरस्कारात 1 लाख रुपये मानधन आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. हा कार्यक्रम कुसूम सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम 29 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे.
29 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता यशवंत महाविद्यालयाच्या मैदानावर चला हवा येऊ द्या हा हास्य विनोदी कार्यक्रम होणार आहे. यात भाऊ कदम, कुशल, बद्रीके, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, सागर करंडे यांच्या संचास आमंत्रीत करण्यात आले. दि.30 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता यशवंत महाविद्यालयाच्या मैदानावर हिंदी हास्य कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यात कवी सबीना, समपत सराळ, घनश्याम अग्रवाल, किरण जोशी, रसबिहारी हे येणार आहेत. दि.1 मे 2022 रोजी सायंकाळी 6 वाजता आदर्श शिंदे आणि त्यांचा संच भिमगितांचे सादरीकरण करणार आहेत. आदर्श शिंदे यांची ख्याती पाहता त्यांच्यासाठी कार्यक्रमस्थळ नंतर जाहिर होणार आहे. कारण त्यांच्या कार्यक्रमात होणारी लक्षणीय गर्दी पाहता योग्य कार्यक्रमस्थळ निश्चित केले जाणार आहे.
रौप्य महोत्सव-2022 मध्ये मराठी साहित्य संमेलन, मुशायरा आणि घनकचरा व्यवस्थापन हे कार्यक्रम सुध्दा कालांतरात आयोजन होणार आहेत. या कार्यक्रमातील खर्च लक्षात घेता त्यास 90 लाखांचा निधी अपेक्षीत आहे. त्यासाठी विधासभा व विधान परिषद सदस्यांकडून प्रत्येकी 10 लाख रुपये निधी घेतला जात आहे. त्यास आ.मोहन हंबर्डे, आ.बालाजी कल्याणकर, आ.माधवराव पाटील जवळगावकर, आ.विक्रम काळे आदींनी हा निधी देण्याचे मान्य केले आहे. हा निधी देण्यासाठी नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे विनंती करण्यात आली आहे. जनतेने या रौप्य महोत्सव-2022 मधील कार्यक्रमांना उपस्थित राहून नांदेडच्या सांस्कृतीक वैभावाचे दर्शन घ्यावे आणि मोठ-मोठ्या कलाकारांद्वारे सादर होणाऱ्या कार्यक्रमांचा आनंद घ्यावा असे आवाहन महापौर जयश्री पावडे, आ.अमरनाथ राजूरकर, आ.मोहन हंबर्डे यांनी केले आहे.
नांदेडकरांसाठी मनपाच्या रौप्य महोत्सवात विविध करमणूक कार्यक्रम ; 29, 30 एप्रिल आणि 1 मे रोजी होणार कार्यक्रम