
नांदेड(प्रतिनिधी)-इतरांच्या न्याय हक्कांसाठी आपल्या लेखणीला झिजवून मेहनत घेणाऱ्या बेघर पत्रकारांनी आपल्याच संस्थेतील मोकळ्या भुखंडाची विक्री केल्याचा नवीन प्रकार समोर आला आहे. आपल्या लेखणीच्या शब्दातून इतरांवर आसुड ओढता-ओढता आपल्याच हाताने आपला वाममार्ग बेघर पत्रकारांनी दाखवला आहे.
बेघर पत्रकार आहोत असे सांगत नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेकडून दोन एकर जागा या बेघर पत्रकारांनी काबीज केली. सुरूवातीला या संस्थेचे संस्थापक असणाऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर पत्रकारीतेच्या नावावर आपला धंदा चालवणाऱ्यांचा शिरकाव या पत्रकार सहवास को.हाऊसिंग सोसायटीमध्ये शिरकाव झाला. यामध्ये करण्यात आलेल्या लेआऊटनुसार एकूण 36 भुखंड होते. त्यात कांही मोठ्या चतु:सिमेचे तर कांही लहान. आप-आपल्या पध्दतीने यात शिरकाव केलेल्यांनी ते भुखंड लाटले. त्यातील यादीप्रमाणे 36 भुखंडांपैकी 35 भुखंड वेगवेगळ्या महान आणि बेघर पत्रकारांना देण्यात आले. एक भुखंडाचा काहीच हिशोब लागत नव्हता. या बाबत शोध घेतला असता नवीनच धक्कादायक माहिती समोर आली.
मोकळा भुखंड हा या सोसायटीकडून हनुमानगडकडे जाणाऱ्या रस्त्यावर होता. महानगरपालिकेला दरवर्षी पैसे भरायचे आहेत. म्हणून तो भुखंड मोकळा ठेवला गेला होता. त्याचा व्यवसायीक वापर करून त्यातून होणाऱ्या उत्पन्नातून महानगरपालिकेचे पैसे भरले जातील असे नियोजन बेघरांमधील कांही चांगल्या पत्रकारांनी केले होते. पण इतरांच्या न्याया हक्कासाठी लढणारी मंडळी आम्हीच आहोत असा आव आणून धंदा करणाऱ्यांनी 36 पैकी 1 शिल्लक राहिलेल्या भुखंडाची पण विक्री केली. त्या विक्रीतून आलेले उत्पन्न कोणा-कोणाच्या हक्कात आले हा शोध विषय असला तरी भुखंड खरेदी करणारा व्यक्ती हा व्यापारी आहे. पत्रकार नाहीच हे खरे आहे. कॉंगे्रस आमदाराच्या घराचे काम सुध्दा या सोसायटीत सुरू आहे. त्यांचे काम सुरू झाल्यावर त्यांना ज्या बेघर पत्रकाराने भुखंड विकला होता. त्याचाच सर्वात मोठा सहभाग रिकामा भुखंड विक्री करण्यात असल्याची खात्रीलायक माहिती आहे. हाडाचा पत्रकार असलेल्या या बेघर पत्रकाराने विकलेल्या स्वत:च्या भुखंडानंतर मोकळ्या भुखंडाला विकून किती कमाई केली. हा काही लिहिण्याचा विषय नाही. हा भुखंड विक्री झाल्यावर महानगरपालिकेला पैसे भरण्याची सोय करण्याची जबाबदारी आपली नाही म्हणून बेघर पत्रकारांनी या भुखंडाचा पण धंदा केला.
महानगरपालिकेची जागा असतांना ती भाड्यावर घेतली असतांना त्यात भुखंड तयार करून ते विक्री केले जात आहेत. ज्यांना विक्री केले ते किती मोठ्या-मोठ्या दैनिकांचे पत्रकार आहेत. आज ज्यांच्याकडे भुखंड आहेत. ते सुध्दा आपले भुखंड विक्री करण्यासाठी अनेकांचे उंबरठे झिजवत आहेत. जे विक्री करून मोकळे झाले आहेत. ते मुग गिळून गप्प बसले आहेत. पण दुर्देवी बाब म्हणजे महानगरपालिकेच्या मालकीची दोन एकर जागा घेवून आम्ही पत्रकार आहोत आम्हाला घरे नाहीत असा आव आणून ते भुखंड विक्री करून त्यातून लाखोची कमाई करणाऱ्या लोकांना नांदेडच्या सर्वसामान्य जनतेच्या मालकीची जागा महानगरपालिका पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी या बेघर पत्रकारांना आंदण देवून नांदेडच्या नागरीकांवर केलेले उपकार नक्कीच महत्वपूर्ण आहेत.
