
नांदेड(प्रतिनिधी)-महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूकीत हल्ला करून खून करणाऱ्या दोघांना फाशी द्या अशी मागणी करत आंबेडकरवादी युवकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चाद्वारे येवून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
14 एप्रिल रोजी रात्री बळीरामपूर येथील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निघालेली मिरवणूक नाईक कॉलेजसमोर आली तेंव्हा त्या ठिकाणी उपस्थित असलेले किशोर ठाकूर आणि शेख आदील यांना मिरवणूकीत धुमाकोळ घालणे आणि महिलांचे फोटो काढणे याबाबत सचिन थोरात याने समज दिली तेंव्हा किशोर ठाकुरने सचिन थोरातला चाकुने भोसकून त्याचा खून केला. तसेच त्याचा सहकारी मित्र सुमेध वाघमारे याला जबर मारहाण केली. या घटनेच्या आधारावर आंबेडकरवादी युवकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात एका मोर्चाद्वारे येवून जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन सादर केले. या निवेदनातील मागणीनुसार सचिन थोरातचा खून करणाऱ्याला फाशी द्यावी, मयत व जखमींच्या कुटूंबियांना समाज कल्याण विभागाकडून तात्काळ मदत मिळावी. जखमी तरुणाला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात पाठवावे. सर्व घटनेची उच्चस्तरीय अधिकाऱ्याकडून चौकशी व्हावी. मयत सचिन थोरात हा कर्ता व्यक्ती होता आणि तो आता न राहिल्यामुळे त्याच्या कुटूंबातील आईला शासनाने योग्य आर्थिक मदत देवून त्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे. जिल्ह्यातून ग्रामीण भागात निघणाऱ्या भिमजयंती मिरवणूकांना प्रशासनाकडून संरक्षण मिळावे. मयत सचिन थोरातच्या कुटूंबियांना सध्या निवारा नसल्यामुळे त्यांना जवाहरलाल नेहरु अंतर्गत येणारे निवासस्थान देण्यात यावे अशा मागण्या नमुद आहेत.
या निवेदनावर, आरती अशोक थोरात, अमोल रामराव थोरात, आनंद लक्ष्मण थोरात, ऍड.यशोनिल मोगले, प्रतिक मोरे, अतिश ढगे, कपील वावळे, प्रा.विनायक गजभारे, निरंजनाताई आवटे, प्रा.राजू सोनसळे, सुरेश सावंत, डॉ.सिध्दार्थ भेदे, मारोती डोईबळे, प्रतिक वामघारे, माधव गुंडले, सुरेश सावते, साहेबराव सरोदे, धम्मा एंगडे, अशोक वाघमारे, प्रदीप वाघमारे, अभय जोंधळे, इंद्रजित पांचाळ आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

संबंधीत बातमी..
https://vastavnewslive.com/2022/04/15/नांदेड-ग्रामीण-पोलीस-ठाण-36/