नांदेड(प्रतिनिधी)-विमानतळ पोलीसांनी पुष्पा, गॅंगस्टर, भाई बनण्याच्या मार्गावर असलेल्या 6 युवकांना बनावट हत्यारांसह पकडून त्यांच्याविरुध्द भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरिक्षक अनिरुध्द काकडे यांनी त्यांना सिंघम, वर्ग 1 अधिकारी बनण्याची स्वप्ने पाहायला शिकवली.
दि.19 एप्रिलच्या मध्यरात्रीनंतर 2 वाजेच्यासुमारास विमानतळचे पोलीस निरिक्षक अनिरुध्द काकडे, सहाय्यक पोलीस निरिक्षक बाळू गिते, पोलीस अंमलदार बंडू कलंदर, बाबा गजभारे आणि इतरांनी आपल्या हद्दीतील जवळपास 6 गुन्हेगारांची माहिती जमा केली ते सर्व बाहेरगावी गेलेले होते. त्यासोबतच पोलीसांनी 3 बिना नंबरच्या दुचाकी गाड्या ताब्यात घेतल्या.सोबतच 69 वाहनांची तपासणी करून 8 वाहनांकडून 3 हजार 300 रुपये रोख रक्कम आणि 18 वाहनांवर 12 हजार रुपये दंड वसुल करण्याची कार्यवाही केली.
सोबतच पुष्पा, गॅंगस्टर, भाई बनण्याच्या नादात कांही युवकांनी अनेक सामाजिक संकेतस्थळांवर पिस्तुलांसह काढलेले फोटो त्यांना महागात पडले. त्या सर्व सहा जणांना विमानतळ पोलीसांनी ताब्यात घेतले. त्यातील चार जण अल्पवयीन विधीसंघर्षग्रस्त बालक आहेत. सहाय्यक पोलीस निरिक्षक बाळू गिते यांच्या तक्रारीवरुन या युवकांविरुध्द गुन्हा क्रमांक 143/2022 भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 6/25 सोबत भारतीय दंड संहितेच्या 34 या कलमानुसार दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार जाधव यांच्याकडे देण्यात आला आहे.
