राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी आपल्या वैद्यकीय तपासण्या करून घेणे आवश्यक

40 ते 50 वयोगटातील लोकांनी दोन वर्षातून एकदा आणि 51 च्या पुढच्या लोकांनी दरवर्षी
नांदेड(प्रतिनिधी)- राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या 40 ते 50 या वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना दोन वर्षातून एकदा व 21 व त्यावरील वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी दरवर्षी आपल्या 17 विविध तपासण्या करायच्या आहेत असा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने जारी केला आहे. या शासन निर्णयावर अवर सचिव रोशनी कदम पाटील यांची डिजिटल स्वाक्षरी आहे. या तपासण्यांसाठी शासन 5 हजार रुपये इतकी खर्चपुर्ती रक्कम सुध्दा देणार आहे.
राज्यातील 40 वर्ष वय पार करून पुढे गेलेले शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना प्राप्त होत असलेल्या सुविधेप्रमाणे समान वैद्यकीय चाचण्या मिळाव्यात. या सर्व चाचण्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिन राहणाऱ्या संस्थामार्फत करून घेण्यास मुभा देण्यात आली आहे. कांही चाचण्या उपलब्ध नसतील तर त्यासाठी बाह्य यंत्रणेद्वारे त्या उपलब्ध करून देण्याची कार्यवाही आरोग्य सेवा विभागाच्या आयुक्तांनी करून द्यायची आहे.
सन 2014 मध्ये सुध्दा असा शासन निर्णय जारी झाला होता. त्यात मात्र भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांना या चाचण्या मिळत होत्या. आता राज्य सेवेतील अधिकारी आणि कर्मचारी यांना सुध्दा या चाचण्या मिळाव्यात म्हणून शासनाने असा निर्णय घेतला आहे. या चाचण्याकरतांना होणाऱ्या खर्चाची प्रतिपुर्ती करण्यासाठी 5 हजार रुपये रक्कम कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात येईल. वैद्यकीय तपासण्या करतांना एक दिवस हा कालावधी कर्तव्यकाळ म्हणून समजण्यात येईल. तपासण्यापुर्वींची पुर्व तयारी आवश्यक खबरदारी रुग्णालयाच्या सल्याने प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याने घ्यायची आहे. वैद्यकीय तपासणी करण्याकरीता मुख्यालय सोडून बाहेर जावे लागत असेल तर आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक आहे. झालेल्या वैद्यकीय तपासणीची नोंद प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याच्या गोपनिय अहवालात करायची आहे. भारतीय प्रशासनिक सेवेतील अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या वैद्यकीय सुविधा राज्य शासनाने आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या शासन निर्णयाद्वारे उपलब्ध करून दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *