नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा व भोकर मतदारसंघाच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिल्याबद्दल पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचा मास्टरस्ट्रोक म्हणून सर्वत्र कौतुक होत आहे . याचे आम्ही स्वागत करतो परंतु सर्वांगीण विकासासाठी शेतकरी व सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी न मिळालेला पीकविमा, तोकडी नुकसानभरपाई , एक रकमी एफआरपी , कर्जमाफी , वीजबिल माफी करिता एखादा मास्टर स्ट्रोक मारावा अशी अपेक्षा शिवसेनेचे शेतकरी नेते तथा ऊस दर नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी व्यक्त केली .
राज्याच्या मंत्रिमंडळात पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचे चांगले वजन आहे परंतु त्यांच्या वजनाचा फायदा शेतकर्यांसाठी फारसा झालेला दिसत नाही . मोठमोठे महामार्ग , बुलेट ट्रेन किंवा कोट्यवधी रुपयांचे बांधकाम प्रकल्प यासाठी पालकमंत्री नेहमी आग्रही असतात त्याबद्दल त्यांचे कौतुक. परंतु शेतकर्यांच्या बाबतीत पालकमंत्री कधीही संवेदनशील दिसले नाही शेतकर्यांच्या वीज तोडण्याचा प्रश्न ,न मिळालेल्या पीक विम्याचा प्रश्न , शेतकर्यांना मिळत असलेली तोकडी नुकसानभरपाई अर्धवट कर्जमाफी , नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना अद्याप न मिळालेले प्रोत्साहन योजना , एफआरपी चे केलेले तुकडे , न मिळणारा हमीभाव , कर्जासाठी बँकांची चालणारी मुजोरी , याबाबत पालकमंत्र्यांनी कधीही संवेदनशीलतेने पाहिले नाही याबद्दल खेद वाटतो . शेतकरी शेतमजुरांना उपाशी ठेवून कोणत्याही भागाचा सर्वांगीण विकास होत नाही म्हणून कोट्यवधी रुपयांचे प्रकल्पास आणून नांदेड जिल्ह्यासह भोकर मतदारसंघात विकासाचे मास्टर स्ट्रोक मारणा-र्या पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी शेतकर्यांच्या प्रश्नावरही एखाद्या मास्टरस्ट्रोक मारावा जेणेकरून आपल्या भागाचा सर्वांगीण विकास साधता येईल अशी अपेक्षा शिवसेनेचे शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी व्यक्त केली.