14 वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या युवकाला 10 वर्ष सक्तमजुरी

नांदेड(प्रतिनिधी)-14 वर्षीय अल्पवयीन बालिकेवर मध्यरात्री तिच्या घरात प्रवेश करून अत्याचार करणाऱ्या 21 वर्षीय युवकाला येथील अतिरिक्त सह जिल्हा व सत्र न्यायाधीश, विशेष पोक्सो न्यायालयाचे न्यायाधीश रविंद्र पांडे यांनी 10 वर्ष सक्तमजुरी आणि 5 हजार रुपये रोख दंड शिक्षा ठोठावली आहे.
अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहणारी 14 वर्षीय बालिका आपल्या भावासोबत घरात झोपली होती. हा दिवस 2 ऑक्टोबर 2020 हा होता. त्या दोघां भाऊ बहिणीचे आई-वडील घराबाहेर झोपले होते. मध्यरात्री त्यांच्या घराशेजारी राहणारा सुनिल प्रकाश गजभारे (21) हा युवक बालिका झोपलेल्या खोलीवरील पत्रे बाजूला करून आत आला आणि त्या बालिकेवर अत्याचार केला. त्यावेळी तिने आरडा ओरड केला. तेंव्हा लहान भाऊ उठला पण अत्याचार करणाऱ्याने त्या बालिकेला अत्याचार झाल्याशिवाय सोडलेच नाही. लहान भाऊ बाहेर जाऊन आई-वडीलांना घेवून आला त्यावेळी सुनिल प्रकाश गजभारे हा नैसर्गिक अवस्थेत त्या खोलीत लपण्याचा प्रयत्न करत होता. अर्धापूर पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 264/2020 भारतीय दंड संहितेच्या कलम 376(3) आणि पोक्सो कायद्याच्या कलम 4, 5 (1), 6 नुसार दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक विष्णुकांत गुटे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक आर.टी.नांदगावकर यांनी केला.
बालिकेवर अत्याचार करणारा सुनिल प्रकाश गजभारे यास अटक करून नांदगावकर यांनी त्याच्याविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. न्यायालयात विशेष पोक्सो खटला क्रमांक 144/2020 सुरू झाला तेंव्हा त्यात बालिकेची वैद्यकीय तपासणी करणाऱ्या डॉ.आर.डी.अवसरे यांच्यासह 10 साक्षीदारांनी आपल्या जबान्या न्यायालयासमक्ष नोंदविल्या. उपलब्ध पुरावा आधारे अटकेपासून आजपर्यंत तुरूंगात असलेल्या सुनिल प्रकाश गजभारेला न्यायाधीश रविंद्र पांडे यांनी दहा वर्ष सक्तमजुरी आणि 5 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली. या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता ऍड.सौ.एम.ए.बत्तुला (डांगे) यांनी मांडली  अर्धापूर पोलीस सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक व्ही.एम.पठाण यांनी पैरवी अधिकाऱ्याची भुमिका बजावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *