पाच चोरी प्रकारांमध्ये 2 लाख 26 हजार रूपायांचा ऐवज लंपास

नांदेड (प्रतिनिधी)- हदगाव शहरात घर फोडून चोरट्यांनी 35 हजार रूपये रोख रक्कम चोरली आहे. रातोळी ता. नायगाव येथे घर फोडून चोरट्याने 1 लाख 25 हजार रूपयांचा ऐवज लांबविला आहे. सहस्त्रकुंड ता. किनवट येथे ग्रामपंचायतमधील 25 हजार रूपये किंमतीचे मोटारीचे सुटेभाग चोरण्यात आले आहेत. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 40 हजार रूपयांची दुचाकी चोरीला गेली आहे. कल्लाळी ता. कंधार येथून मंदिराची घंटा चोरीला गेली आहे. या सर्व चोरी प्रकारांमध्ये 2 लाख 26 हजार 500 रूपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.

गजानन प्रभाकर रेवणवार हे आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी नांदेडला आले असताना 30 एप्रिलच्या रात्री 8.30 ते 1 मेच्या पहाटे 6 वाजेदरम्यान त्यांचे घर कोणीतरी चोरट्यांनी फोडले. त्यातून 35 हजार रूपये रोख रक्कम चोरी झाली आहे. हदगाव पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार हंबर्डे अधिक तपास करीत आहेत.

शिक्षक असलेले जेजेराव दादाराव पाटील हे 30 एप्रिल रोजी रात्री 11 वाजता रातोळी येथील आपल्या घराच्या गच्चीवर झोपण्यासाठी गेले. 1 मेच्या पहाटे 5 वाजता ते खाली आले तेव्हा त्यांच्या घराचे चॅनलगेट आणि मुख्य दरवाजा तोडून चोरट्यांनी त्या घरातील 90 हजार रूपये रोख रक्कम आणि त्यांचे शेजारी उत्तम नरसिंग पाटील यांच्या घरातील 35 हजार रूपये रोख रक्कम अशी 1 लाख 25 हजार रोख रक्कम चोरून नेली आहे. नायगाव पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक बाचावार अधिक तपास करीत आहेत.

परसराम चिमणाजी राहूलवाडी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 27-28 एप्रिलच्या काळात सहस्त्रकुंड येथील पैनगंगा नदीच्या काठावर ग्रामपंचायत कार्यालयाच्या बंद दरवाज्याच्या पाट्या काढून त्यात ठेवलेले पाण्याच्या मोटारीचे सुटे भाग, किंमत 25 हजार रूपयांचे कोणीतरी चोरून नेले आहे. ईस्लापूर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस अंमलदार आर.एस. कांबळे करीत आहेत.

दि. 27 एप्रिल रोजी विनायक बाबाराव गंजगाळे यांची दुचाकी क्र. एम.एच. 26 बी.यु. 3928 ही रात्री 9 वाजेच्या सुमारास रूबी वॉईन मार्ट कॅन्सर हॉस्पीटल चौरस्ता येथून चोरीला गेली आहे. या दुचाकी गाडीची किंमत 40 हजार रूपये आहे. नांदेड ग्रामीण पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार शेख जावेद अधिक तपास करीत आहेत.

कल्लाळी शेतशिवार ता. कंधार येथील महादेव मंदिराच्या ओट्यावर बांधलेल्या लहान-मोठ्या 25-30 घंटा चोरीला गेल्या आहेत. यांची किंमत 1500 रूपये आहे. हा घटनाक्रम 1 मेच्या सकाळी 10 वाजता लक्षात आला. गणपती माधवराव तोटवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून कंधार पोलिसांनी घंटा चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार व्यवहारे अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *