आजपासून 25 जिल्ह्याच्या जि.प.निवडणुका आणि 284 पंचायत समिती निवडणुकांसाठी निवडणुक आयोगाच्या कार्यालयात निमंत्रण

नांदेड(प्रतिनिधी) -सर्वोच्च न्यायालयाच्या 4 मे रोजीच्या निकालानंतर महाराष्ट्र निवडणुक आयोगाने 25 जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत येणाऱ्या 284 पंचायत समिती निवडणुकांबाबत गांभीर्याने दखल घेतली आहे. 6 ते 8 मे 2022 या दरम्यान त्यांनी प्रभाग रचनेच्या माहितीसह जिल्हा निहाय लोकांना आयोगाच्या कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
4 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेदरम्यान निर्णय देतांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रोखता येणार नाहीत असे निर्देश दिले. त्यानंतर लगेच 5 मे रोजी राज्य निवडणुक आयोग महाराष्ट्र कार्यालयातील उपआयुक्त अविनाश सनस यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र पाठवले. राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांमध्ये मुंबई, मुुंबई उपनगर, ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम, भंडारा, नागपूर, व गोंदिया जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना वगळ्ण्यात आले आहे.
25 जिल्हा परिषदा आणि 284 पंचायत समित्या यांची निवडणुक घेणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रारुप प्रभागरचना सुरू होती ती सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयासाठी थांबवली होती. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर राज्य निवडणुक आयोगाने प्रारुप नकाशे, गुगल नकाशावर तयार करणे, जनगणनेची आकडेवारी लिंक करणे या कामासाठी जिल्हानिहाय लोकांना निवडणुकीसंदर्भाची सर्व कागदपत्रे, जनगणनेची आकडेवारी, निवडणुक विभाग/ निर्वाचक गणांची गावनिहाय आकडेवारी आणि सर्व निकाशे सॉफ्ट कॉपीसह घेवून निवडणूक आयोगाच्या कार्यालयात मुंबई येथे हजर राहण्यास सांगितले आहे.
ज्या जिल्ह्यांना 6 ते 8 मे दरम्यान हि सर्व माहिती आणण्यास सांगितली आहे ते जिल्हे पुढीलप्रमाणे आहेत. दि.6 मे 2022-रायगड, रत्नागिरी, सिंधदुर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर, सांगली. दि.7 मे 2022-पुणे, सातारा, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा. दि.8 मे 2022-कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, चंद्रपुर आणि गडचिरोली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *