नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत 4 मे रोजी झालेल्या खून आणि जीव घेणा हल्ला या प्रकरणात आता नवीनच वळण आले आहे. या गुन्ह्याच्या पोलीस प्राथमिकीमध्ये तीन जणांची नावे आहेत. पण आम्ही एफआयआरमध्ये 9 जणांची नावे दिली होती असा आरोप या प्रकरणातील मयत यांच्या बंधूने पोलीस अधिक्षक कार्यालयात दिलेल्या अर्जात केला आहे.
शेख युनुस शेख अमीन यांनी दिलेल्या अर्जानुसार 4 मे रोजी सकाळी 11 वाजता ते आपल्या आई-वडीलांच्या घरी हिंमतनगर येथे आले होते. दुपारी 3.30 च्यासुमारास माझा भाऊ शेख फारुख याने सांगितले की, बकीट कारखान्याजवळ मला शिवीगाळ व मारण्याची धमकी दिली. तेंव्हा मी माझा मुलगा सोहेल, भाऊ रमजान असे तेथे गेलो असतांना तेथे समद, मुख्तार, सोहेल, मुन्ना, बब्बू, बशीर, सलमान, अल्ताफ, साईल असे सर्व जण मिळून आम्हाला दगड, कुऱ्हाडी, खंजीरच्या सहाय्याने मारहाण करून लागले. या मारहाणीत माझा भाऊ फारुख जागीच मरण पावला. व दुसरा भाऊ गंभीर जखमी आवस्थेत यशोसाई रुग्णालयात उपचार घेत आहे. नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे येथे आम्ही 9 जणांची नावे सांगितली असता एफआयआरमध्ये तिघांचीच नावे टाकली आहेत.
5 मे रोजी मला रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर मी 6 मे रोजी दुपारी 12 वाजता एफआयआर घेण्यासाठी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गेलो तेंव्हा एफआयआरमध्ये समद, मुख्तार, सोहेल या तिघांचीच नावे होती. तेंव्हा तेथे हजर असलेल्या पोलीस उपनिरिक्षकांना (मला नाव माहित नाही) 9 जणांची नावे असतांना तिघांचेच नाव का टाकले इतर मुन्ना, बबु, सलमान, बशीर, अलताफ, साईल या सहा जणांची नावे का टाकली नाही असे विचारले असता त्या साहेबांनी दुसऱ्या साहेबांना विचार मला माहित नाही असे सांगितले. तरी पोलीस अधिक्षक साहेबांनी आम्हा मारहाण करणाऱ्या आणि भावाचा खून करणाऱ्या सर्व जणांची नावे एफआयआरमध्ये नमुद करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा असा मजकुर या अर्जात लिहिलेला आहे.
जानेवारी महिन्यात सुध्दा या दोन गटांमध्ये भांडण झालेले आहे. त्याबद्दल तहसील कार्यालयात प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आलेली आहे. त्या प्रतिबंधात्मक कार्यवाहीच्या जबाबात असे दिसून येते की, एकाच प्रकारचे काम दोन गटाचे असल्यामुळे त्यांच्यात वाद झाला पण वादाचा परिणाम भयंकर झाला आणि एकाचा खून झाला.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात अत्यंत कडक शिस्तीचे, कर्तव्यदक्ष, मागील एक वर्षापेक्षा जास्त कालखंडापासून तोंडी आदेशावर पोलीस निरिक्षक हे पद सांभाळणारे दणकट अधिकारी श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब हे आहेत. आता पोलीस अधिक्षक कार्यालयात दिलेल्या या अर्जानुसार काय कार्यवाही होते हे दिसेल?
