पोलीस रात्रीची ड्युटी करीत नाहीत काय?; एका युवकाला मारहाण करून लुटले

नांदेड(प्रतिनिधी)-सर्वांच्या साखर झोपेच्या काळात गडचिरोली जिल्ह्याचा एक युवक आपल्या गावाकडे जाण्यासाठी निघाला. पहाटे 4.30 वाजता ऍटोची वाट पाहत थांबला असतांना कांही जणांनी त्याला लिफ्टचा बहाणा करून स्वत:च्या गाडीवर बसवले आणि जबर मारहाण करून त्याच्या मोबाईल व 1700 रुपये काढून घेतले. मार खालेल्या युवकाने तिघातील एकाला अखेर पकडलेच. पण दुर्देवाने तो अल्पवयीन विधीसंघर्षग्रस्त बालक आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील एक युवक निदेश दुर्गे हा नीट परिक्षेची तयारी करण्यासाठी नांदेडला राहतो. आज 8 मे रोजी सकाळी 4.30 वाजेच्यासुमारास अशोकनगर, भाग्यनगरच्या मुख्य रस्त्यावर गजानन महाराज मंदिरासमोर ऍटो रिक्षाची वाट पाहत थांबला होता. थोड्याच वेळात एका दुचाकीवर तीन जण आले आणि त्यास तुला कुठे जायचे आहे असे विचारून आम्ही तुला सोडतो पण त्यासाठी आम्हाला 100 रुपये द्यावे लागतील असे सांगितले. आपल्या गाडीची वेळ आणि आपल्याकडे उपलब्ध असलेली वेळ यात सांगळ घालत निलेश दुर्गेने 100 रुपये देण्यास होकार दिला. त्या तिघांनी त्याला गाडीवर बसवले आणि त्या मुख्य रस्त्याच्या शेजारी असलेल्या कैलासनगर भागात निमर्नुष्य ठिकाणी नेऊन त्याला मारहाण करण्यास सुरूवात केली. त्याच्या खिशात एक मोबाईल आणि 1700 रुपये होते. तीन जण मारत असतांना सुध्दा दुर्गेने त्यातील सर्वात लहान दरोडेखोराला पकडून ठेवले. आरडाओरड केली. तेंव्हा आसपासची मंडळी घराबाहेर आली आणि त्यांनी दुर्गेची मदत केली आणि तो एक पकडलेला तसाच राहिला आणि इतर दोन मात्र पळून गेले. या संदर्भाची माहिती पोलीसांना देण्यात आल्यानंतर पोलीस तेथे उशीरा पोहचले असा आरोप प्रत्यक्ष घटना पाहणारे लोक करत आहेत. दुर्देवाने पकडलेला दरोडेखोर हा विधीसंघर्षग्रस्त बालक निघाला. पहाटे 4 वाजेच्यासुमारास आपला अल्पवयीन बालक घराबाहेर जात आहे. यावर पालकांचे लक्ष नाही आणि चांगल्या सुदृढ समाजाच्या निर्मितीचा विचार मांडला जातो. पण तो विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी कोण प्रयत्न करणार हा एक वेगळा स्वतंत्र विषय आहे.
पोलीस उशीरा आले
पोलीस विभागामध्ये सात दिवस 24 तास नोकरी आहे. त्यातील माणसे बदलतात पण प्रक्रिया एकच असते. रात्री 8 वाजता नाईट ड्युटीचे पोलीस अंमलदार, बीट अंमलदार, ड्युटी ऑफीसर नोकरीवर येतात. त्यांची ड्युटी दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता नवीन पोलीस अंमलदार व पोलीस अधिकारी आल्यावर संपत असते असा नियम आहे. पण दुर्देव असे आहे की, रात्रीच्या ड्युटीची पोलीस मंडळी कधी घराकडे जातील याचा काही एक नियम नाही, त्यावर कोणी देखरेख ठेवत नाही. आपल्याच माणसाच्याविरुध्द रिपोर्ट लिहिणे हे पोलीसांना चुकीचे वाटते आणि हा प्रकार असंख्य वर्षांपासून असाच सुरू आहे. आज पोलीस उशीरा आले अशी ओरड होत आहे. मुळात कैलास नगर बीटचे पोलीस अंमलदार जर घरी गेले नसतील तर त्यांच्याकडे शासकीय दुचाकी असते आणि ते त्वरीत येवू पण शकतात. पण आले नाहीत म्हणूनच पोलीस उशीरा आले अशी ओरड झाली. पोलीस ठाण्यात माहिती दिली असेल तरी पण पोलीस ठाण्यात एक पीएसओ, हजरपाळी, आरटीपीसी यापेक्षा जास्त लोक नसतात. पीएसओ आणि इतर मंडळी पोलीस ठाणे सोडून येवू शकत नाहीत. मग बीट अंमलदार कुठे गेले होते, गस्ती पार्टी कुठे गेली होती आणि रात्र पाळीचे डी.बी.पथक कोठे होते असे अनेक प्रश्न यातून निर्माण होतात. कागदांवर प्रभुत्व असलेल्या पोलीस उपअधिक्षक श्री.चंद्रसेनजी देशमुख साहेब यांच्या हद्दीत ही घटना घडली आहे. पाहुयात या पुढे तरी ते रात्रीच्या गस्तीपथकाला आपले काम आपल्याला मिळणाऱ्या वेतनाच्या तुलनते योग्यरितीने कसे करून घेतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *