नांदेड(प्रतिनिधी)-रेल्वे गाडीमध्ये छोटे-मोठे व्यवसाय करून जगणाऱ्या एका युवकाचा 29 एप्रिल रोजी अज्ञात मारेकऱ्यांनी खून केला होता. हा घटनाक्रम देगलूरनाका जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या शेजारी असलेल्या झुडपांमध्ये घडला होता. आपल्या जीवनात स्विकारलेल्या कामाला सर्वात मोठे प्राधान्य देणाऱ्या पोलीस निरिक्षक भगवान धबडगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अज्ञात मारेकऱ्याला अखेर शोधलेच. आज 9 मे रोजी 20 वर्षीय युवकाचा खून करणाऱ्या 21 वर्षीय मारेकऱ्याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्रविण कुलकर्णी यांनी पाच दिवस अर्थात 14 मे 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. इतवारा पोलीसांनी एकजुट कुटूंबासारखे काम करून या गुन्ह्याची केलेली उकल नक्कीच प्रशंसनिय आहे.
दि.29 एप्रिल रोजी शांतीनगर भागात राहणारा युवक अमोल प्रभु साबणे हा सकाळी नैसर्गिक विधीसाठी पशुवैद्यकीय दवाखान्याच्या शेजारील झुडपात गेला. तो आणि त्याचा भाऊ आणि वडील हे सर्वच जण रेल्वेमध्ये छोटे-मोठे साहित्य विक्रीचा व्यवसाय करून आपले जीवन चालवतात. भावाला येण्यासाठी उशीर होत आहे म्हणून मोठा भाऊ शाम आपल्या कामावर निघून गेला.रात्री 9 वाजता तो परत आला तेंव्हा त्याने विचारणा केली की, अमोल का नाही आला. तेंव्हा घरातील लोकांनी सांगितले की, तो सकाळपासूनच परत आलेला नाही. त्यानंतर मोबाईलच्या उजेडात अमोल साबणेची शोध मोहिम सुरू झाली आणि रात्री 11 वाजता अमोल साबणेचा मृतदेह सापडला.याबाबत इतवारा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुध्द अज्ञात कारणासाठी अमोल साबणेचा खून केला म्हणून गुन्हा दाखल झाला.या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक भगवान धबडगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक शेख असद यांच्याकडे देण्यात आला.
इतवारा पोलीस ठाण्यातील पोलीस निरिक्षक भगवान धबडगे यांनी त्यावेळी सुरू असलेल्या रमजान उत्सवाच्या काळात फक्त 3 तास झोप घेतली आहे अशी त्यांची ख्याती आहे त्यात हा खून प्रकार म्हणजे समाजात एक अशांतता पसरविणारा घटक बनू नये म्हणून त्यांनी आपल्या सर्व अधिकारी आणि सर्व अंमलदारांसह या कामावर सुध्दा पुर्णपणे लक्ष ठेवले. सहाय्यक पोलीस निरिक्षक आर.एस.मुत्येपोड, शिवसांब स्वामी, पोलीस उपनिरिक्षक रमेश गायकवाड, पोलीस अंमलदार हबीब चाऊस, देशमुख, कलंदर, अनिल गायकवाड, नरहरी कस्तुरे, शिवानंद हंबर्डे, राजू घुले, शेख समीर, मोकले आदींनी या कामासाठी स्वत:च्या आरामापेक्षा जास्त महत्व दिले आणि याचा परिणामही झाला. काल दि.8 मे रोजी पोलीसांनी खडकपुरा भागातील पाण्याच्या टाकीजवळ राहणाऱ्या शेख अकबर उर्फ गुज्जर शेख गौस (21) यास अटक केली. प्राप्त झालेल्या माहितीनुसार शेख अकबर उर्फ गुज्जरने नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या अमोल साबणेकडे चाकुचा धाक दाखवून पैशांची मागणी केली. पैसे न दिल्याने शेख अकबरने अमोल साबणेच्या पोटात, छातीवर, खांद्यावर, गालावर अनेक जागी चाकुचे वार करून त्याचा खून केला आणि त्याच्या खिशातील पैसे घेवून पळून गेला. शेख अकबरविरुध्द लिंबगाव पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा क्रमांक 75/2021 दाखल आहे. तसेच इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 446/2020 भारतीय दंड संहितेच्या कलम 307 नुसार दाखल आहे. हळूहळू प्रगती होवून आता अमोल साबणेचा खून शेख अकबरच्या नावावर लागला आहे. आज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्रविण कुलकर्णी पैसे लुटण्यासाठी अमोल सोबणेचा खून करणाऱ्या शेख अकबर उर्फ गुज्जरला पाच दिवस अर्थात 14 मे 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. अमोलचा अज्ञात मारेकरी शोधणाऱ्या इतवारा पोलीस पथकाचे पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, इतवारा उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी कौतुक केले आहे.
संबंधीत बातमी…
https://vastavnewslive.com/2022/04/30/पशु-वैद्यकीय-दवाखान्यात/