महिला पोलीस अंमलदारावर लैंगिक व आर्थिक अत्याचार

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील एका महिला पोलीसाला विश्र्वासात घेवून तिच्याकडून आपल्या घरातील सांसारीक कामे सुध्दा करून घेत तिच्यावर नियोजित पध्दतीने आर्थिक व लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
नांदेड जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका महिला पोलीस अंमलदाराने दिलेल्या तक्रारीनुसार तिला लग्नासाठी आमिष दाखवून, कट कारस्थान रचून 8 जणांनी तिचा विश्र्वास घात केला. तिच्यासोबत सोयरीक केली आणि एकाने तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केला आणि इतरांनी त्या महिला पोलीसाच्या पदाचा फायदा घेवून आपल्या घरातील मुलांना पोलीस अंमलदाराच्या खर्चावर नांदेडला शिकायला ठेवले. महिला पोलीस पण त्या घरासाठी ही सेवा आपल्या खर्चातून देत होती. हा सर्व प्रकार सन 2018 ते 15 मे 2022 पर्यंत सुरू होता.
महिला पोलीसाने दिलेल्या तक्रारीवरुन भाग्यनगर पोलीसांनी राजू माणिकराव तिळेवाड, माणिकराव चंपतराव तिळेवाड, अरुण माणिकराव तिळेवाड, विनोद माणिकराव तिळेवाड, राम डुकरेवाड, अजय राम डुकरेवाड आणि दोन महिला अशा 8 लोकांविरुध्द गुन्हा क्रमांक 169/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 376(2), (एन), 420, 509, 504, 506 आणि 34 नुसार दाखल केला आहे. पोलीस निरिक्षक सुधाकर आडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक रामकृष्ण पाटील यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *