तक्रारदाराचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

नांदेड(प्रतिनिधी)-अनुसूचित जातीच्या एका व्यक्तीला कपडे काढून इंन्काऊंटर करील अशी धमकी देणाऱ्या नांदेड ग्रामीणचे पोलीस निरिक्षक, गोळी मारण्यात तरबेज असलेले श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब यांना तात्काळ बडतर्फ करावे अशी मागणी करत नागोराव धुताडे यांनी आमरण उपोषण करण्यास सुरुवात केली आहे.
मौजे वडगाव ता.जि.नांदेड येथे गट क्रमांक 206 मध्ये माझ्या शेतातील राहण्याची झोपडी आणि कडबा शेषराव देवराव घोरबांड व इतर दहा जणांनी जाळले, मला सुध्दा जीवंत जाळण्याचा प्रयत्न केला. हा घटनाक्रमक 29 एप्रिल 2021 रोजी घडला. याबाबत 30 एप्रिल 2021 रोजी नागोराव उकंडजी धुताडे यांनी पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथे अर्ज दिला. त्यात शेत शेजारी शेषराव देवराव घोरबांड, दिगंबर देवराव घोरबांड, बालाजी देवराव घोरबांड, दत्ता देवराव घोरबांड, गणेश दिगंबर घोरबांड, नागोराव दिगंबर घोरबांड, भुजंगा दत्ता घोरबांड, संभाजी बालाजी घोरबांड, शंकर बालाजी घोरबांड यांच्यासह एक महिला अशा दहा जणांची नावे दिले. त्यात शेतात अतिक्रमण करून न्यायालयात वाद सुरू असतांना कडबा आणि झोपडी जाळून 40 हजारांचे नुकसान केले.
त्यानंतर 18 एप्रिल 2022 रोजी माझी केस नांदेड ग्रामीण पोलीसांनी दाबून टाकली असा अर्ज नागोराव धुताडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला. त्यानंतर 12 मे 2022 रोजी तहसीलदार नांदेड यांना नागोराव धुताडे यांनी अर्ज देवून उपोषण करणार असल्याची सुचना दिली. त्यानुसार त्यांनी आज 17 मे 2022 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरूवात केली आहे. आजच्या निवेदनासोबत त्यांनी जुने सर्व निवेदन जोउले आहे. त्यात पोलीस निरिक्षक श्री.अशोकरावजी घोरबांड यांनी तु आमच्या घोरबांड कंपनीवर केस करतोस काय?, केस गुणाने मागे घे नसता घोरबांड कुटूंबाच्या महिलेची छेडछाड केली म्हणून तुझ्याविरुध्द उलट केस करतो. तुला लॉकऍपमध्ये टाकतो. डीवायएसपी साहेबापुढे काही न बोलता सह्या कर नाहीतर निरवस्त्र करून चौकात उभे करून तुला लई मारील, मी दोन इंन्काऊंटर करून आलेला पीआय आहे अशा धमक्या देवून माझ्याकडून कागदांवर सह्या करून घेतल्या. पण आता आमरण उपोषण करतांना मी घोरबांड कुटूंबिय यांच्यावर कार्यवाही केल्याशिवाय आमरण उपोषण संपविणार नाही असे लिहिले आहे.
या निवेदनावर दंडाधिकारी शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथील उपचिटणीस मकरंद दिवाकर यांनी 17 मे रोजी नागोराव धुताडे यांना एक पत्र दिले. ते पत्र पोलीस अधिक्षक नांदेड, तहसीलदार नांदेड यांना पाठवलेले आहे. त्यात नागोराव उकंडजी धुताडे रा.वडगाव ता.जि.नांदेड यांच्या अर्जाप्रमाणे कार्यवाही करावी असे नमुद केलेले आहे. पण या पत्रावर नागोराव धुताडे यांचे समाधान झाले नसून त्यांनी दि.18 मे 2022 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरूवात केली आहे.