खून आणि जिवघेणा हल्ला प्रकरणात तीन जणांना जन्मठेप

नांदेड(प्रतिनिधी)-गोकुळगाव ता.माहुर येथे जुन्या भांडणाच्या कारणातून 8 जणांच्या एका गटाने केलेल्या हल्यात एकाचा मृत्यू आणि एक गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणातील 3 जणांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश अशोक धामेचा यांनी तिघांना जन्मठेप आणि प्रत्येकी 6 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
गोकुळगाव ता.माहुर येथे दि.9 सप्टेंबर 2018 रोजी सायंकाळी 4.30 वाजता बुध्दभूषण गुलाब भगत, आतिश कांबळे, हर्षवर्धन मंडल, भूषण कांबळे, आदर्श कांबळे, संतोष नगराळे आणि किरण भगत असे सर्व जण डॉ.आंबेडकर चौकात गप्पा मारत असतांना त्या ठिकाणी प्रितेश विजय मानकर (27), सतिश विजय मानकर (28), रुपेश विजय मानकर (32), देवानंद नथु भगत (46), गौतम नथु भगत(56), विजय एकनाथ मानकर (50), सौ.कमुबाई विजय मानकर (45), निर्मलाबाई गौतम भगत (51) असे सर्वजण आले आणि जुन्या भांडणाच्या कारणातून त्यांनी सर्व प्रथम त्यातील सर्वात वयस्कर व्यक्ती आनंद केशव भगत यांच्या डोळ्यात मिर्चीची पुड टाकली आणि चाकुने त्यांच्यावर हल्ला केला. तसेच त्यांच्यासोबत असलेला सदानंद मुकींदा भगत यालाही अनेक ठिकाणी चाकुने मारून गंभीर जखमी केले. या बाबतची तक्रार किरण आनंद भगत यांनी दिली. त्यावेळी किरण भगत आणि इतरही जण जखमी झाले होते.
या तक्रारीवरुन सिंदखेड पोलीसांनी गुन्हा क्रमांक 26/2018 भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 307, 120(ब), 143, 147, 148, 149 आणि 323 नुसार गुन्हा क्रमांक 89/2018 दाखल केला. या प्रकरणाचा तपास सिंदखेडचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरिक्षक मल्हारी शिवरकर यांनी केला.मल्हारी शिवरकर यांनी या प्रकरणी सखोल तपास करून 8 आरोपींना अटक केले आणि त्यांच्याविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. जिल्हा न्यायालय नांदेड येथे हा सत्र खटला क्रमंाक 168/2018 या क्रमांकानुसार सुरू होता. न्यायालयाने या प्रकरणी एकूण 12 साक्षीदारांच्या जबान्या नोंदविल्या. त्यात जखमी झालेला साक्षीदार सदानंद भगत आणि वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्षी आणि पुरावे महत्वपूर्ण ठरले. या प्रकरणात गुन्हा दाखल होण्यामध्ये झालेला उशीर आरोपी पक्षाने न्यायालयासमक्ष मांडला. पण जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड. आशिष गोदामगावकर तो उत्कृष्टपणे खोडून काढला.
न्यायालयाने उपलब्ध पुराव्यानुसार गुन्हेगारांमधील प्रितेश विजय मानकर(27), सतिश विजय मानकर (28) हे दोन सख्ये बंधू आणि देवानंद नथु भगत (46) सर्व रा.गोकुळगाव ता.माहुर या तिघांना आनंद केशव भगत यांचा खून करणे आणि सदानंद मुकींदा भगत यांच्यावर जिवघेणा हल्ला करणे या सदराखाली दोषी जाहिर केले. न्यायाधीश अशोक धामेचा यांनी या तिघांना भारतीय दंड संहितेच्या कलम 302 साठी जन्मठेप आणि प्रत्येकी 3 हजार रुपये रोख दंड. भारतीय दंड संहितेच्या कलम 307 प्रमाणे 10 वर्ष सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये रोख दंड. भारतीय हत्यार कायद्या कलम 3/25 नुसार एक वर्ष सक्तमजुरी आणि एक हजार रुपये रोख दंड, तसेच दंड न भरल्यास त्यासाठी वेगळ्या शिक्षा निकालात उल्लेखीत करण्यात आल्या आहेत. या सर्व शिक्षा एकत्रीत भोगायच्या आहेत. या तीन आरोपींना एकूण दंड 6 हजार रुपये झाला आहे. या खटल्यात सिंदखेड पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार दिलीपसिंघ मल्ली बकल नंबर 2071 यांनी पैरवी अधिकाऱ्याची भुमिका उत्कृष्टपणे पुर्ण केली. या खटल्यात आरोपींच्यावतीने ऍड.एन.जी. काकडे यांनी सादरीकरण केले होते. इतर पाच जणांची या खटल्यातून मुक्तता झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *