नांदेड(प्रतिनिधी)-आपला सुपूत्र पोलीस उपनिरिक्षक बनून पहिल्यांदा नांदेडला आल्यानंतर त्याचा लाड करण्याऐवजी नांदेडमध्ये घडलेल्या गुन्हेगारांना पकडण्याची जबाबदारी ही जास्त मोठी आहे हे लक्षात ठेवत स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी सहा दरोडेखोरांना ताब्यात घेतले आहे आणि तीन फरार झाले आहेत.
पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांचा सुपूत्र अभिजित चिखलीकर हे पोलीस उपनिरिक्षक पदावर आपले प्रशिक्षण पुर्ण करून दोन दिवसांपुर्वीच नांदेडला आले आहेत. आधी लगीन कोंडाण्याचे मग रायबाचे या आशयावर त्यांनी आपल्या मुलाच्या सन्मानाचा विषय बाजूला ठेवून 7 ऑगस्ट रोजी अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागेली येथे घडलेल्या दरोड्याचा गुन्हा उघडकीस आणण्यात महत्व दिले.
7 ऑगस्ट रोजी अर्धापूर हद्दीतील गजानन पंडीत गव्हाणे हे आपल्या सहकाऱ्यांसह गोविंद मुसळे यांच्या शेतात जेवन करत असतांना आशिष सपुरे, सुरज गाडीवाले, ईश्र्वरसिंघ गिरणीवाले व इतर सात ते आठ जणांनी शस्त्राचा धाक दाखवून तेथे दरोडा टाकला आणि 80 हजार 30 रुपये जबरीने चोरून नेेले. याबाबतचा गुन्हा अर्धापूूर पोलीस ठाण्यात 282/2023 या क्रमांकाने दाखल झाला.
8 ऑगस्ट रोजी पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांना मिळालेल्या माहितीनुसार अर्धापूर हद्दीत दरोडा टाकणाऱ्या आरोपींपैकी काही आरोपी नंदीग्राम सोसायटी आणि नांदेडच्या इतर भागात आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या सहकारी पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना त्यांना पकडण्यास पाठविले. स्थानिक गुन्हा शाखेचे पथकाने ईश्र्वरसिंघ जसवंतसिंघ गिरणीवाले (26), सुरेंद्रसिंघ उर्फ सुरज जगतसिंघ गाडीवाले (22), शुभम राजकुमार खेलबुडे (24), जसप्रितसिंघ उर्फ यश गेंदासिंघ कामठेकर (23), शरणपालसिंघ गुरमितसिंघ राघी (26), जसलोकसिंघ नवनिहालसिंघ कारीगर (20) यांना ताब्यात घेतले. त्यांनी सांगितले की, आमच्यासोबत बलप्रितसिंघ उर्फ आशिषसिंघ नानकसिंघ सपुरे, रबज्योतसिंघ उर्फ गब्या जसविंदरसिंघ तिवाना, अमृतसिंघ अमरजितसिंघ तोपची आणि शेख आवेज उर्फ अब्बु शेख महेमुद हे पण होते. सध्या क्रमांक 7 ते 10 हे फरार आहेत. पकडलेल्या आरोपींकडून स्थानिक गुन्हा शाखेने 45 हजार रुपये रोख रक्कम जप्त केली असून पुढील तपासासाठी सहा जणांना पोलीस ठाणे अर्धापूर यांच्या स्वाधीन केले आहे.
24 तासात दरोड्याचे आरोपी पकडणाऱ्या पोलीस पथकाचे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराव धरणे यांनी पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग माने, पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे, आशिष बोराटे, जसवंतसिंघ शाहु, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक माधव केंद्रे, पोलीस अंमलदार मोतीराम पवार, रणधिर राजबन्सी, विलास कदम, गणेश धुमाळ, ज्वालासिंघ बावरी,गंगाधर घुगे, हनुमानसिंह ठाकूर, महिला पोलीस अंमलदार किरण बाबर, पंचफुला फुलारी आदींचे कौतुक केले आहे.
दरोडा टाकणारे सहा गुन्हेगार स्थानिक गुन्हा शाखेने 24 तासात गजाआड केले