नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेसाठी 50 हजार मोदकांचा प्रसाद तयार; जगदीश भंडारवार जाणार की टिकणार ?

नांदेड(प्रतिनिधी)-धाराशिव जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हा शाखेसाठी तेथील पालकमंत्री तानाजी सावंत यांनी पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांना केलेल्या सार्वजनिक दमबाजीचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. नांदेड जिल्हा पोलीस दलात सुध्दा असेच काही घडेल की काय याची भिती तयार होत आहे. कारण आता त्वरीत प्रभावाने 20 हजार मोदक लोकसभा निवडणुकीत 10 हजार मोदक आणि विधानसभा निवडणुकीत 30 हजार मोदक देण्याची तयारी दाखवणाऱ्या एका पोलीस निरिक्षकाला टेकड्यांमध्ये गाव असणाऱ्या नेत्याने तुच नांदेड स्थानिक गुन्हा शाखेचा पोलीस निरिक्षक असे वचन दिले आहे. ही वचनपुर्ती योगेश्र्वर करणार नाहीत या भितीने त्या नेत्याने मुंबई येथे ठाण मांडलेले आहे.

नांदेड जिल्हा स्थानिक गुन्हा शाखेच्या खुर्चीची सत्ता 38 महिने गाजविल्या नंतर 19 फेब्रुवारी 2023 रोजी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्थानिक गुन्हा शाखेच्या खुर्चीवर पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांची नियुक्ती केली. आपल्या पोलीस सेवा काळातील 8 महिने शिल्लक आहेत. म्हणून तत्कालीन पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण(मॅट)कडे दाद मागली. ते मॅटमध्ये का गेले याचा इतिहास लिहिला तर मूळ मुद्दा बाजूला पडेल असो. मॅटने चिखलीकरांच्या केलेल्या बदलीला स्थगिती दिली. त्यामुळे त्यांनी आणखी आठ महिने अशी एकूण 46 महिन्यांची प्रदिर्घसेवा नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेवर दिली. 31 ऑक्टोबर 2023 रोजी ते सेवानिवृत्त झाले. आणि त्यानंतर 19 फेब्रुवारी 2023 च्या आदेशानुसार स्थानिक गुन्हा शाखेच्या खुर्चीवर पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांनी आपले नाव कोरले. आज दिवाळीच्या पुर्व संध्येला सुध्दा जगदीश भंडरवार स्थानिक गुन्हा शाखेत कार्यरत आहेत.

काही दिवसांपुर्वी धाराशिव जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांना धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी सार्वजनिक ठिकाणी दमबाजी केली होती की, मला आजच्या आज स्थानिक गुन्हा शाखा धाराशिव येथे वासुदेव मोरे यांची नियुक्ती हवी आहे. आजच्या-आज आदेश काढा. मी मुख्यमंत्र्यांचे सुध्दा ऐकत नाही असे काही शब्द त्या व्हिडीओमध्ये आहेत. अखेर पोलीस निरिक्षक वासुदेव मोरेची नियुक्ती धाराशिव जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हा शाखेत झाली. धाराशिवमध्ये काम करतांना वासुदेव मोरे यांना एकदा निलंबन पाहावे लागलेले असतांना सुद्धा धाराशिवमध्ये असे घडले आणि मोरे स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक बनले.

असाच काहीसा प्रकार नांदेड जिल्ह्यातील स्थानिक गुन्हा शाखा मिळविण्यासाठी एक पोलीस निरिक्षक तयार आहे.पण तेथे अतुल कुलकर्णी आहेत. नांदेड जिल्ह्यात श्रीकृष्ण कोकाटे आहेत. प्राप्त झालेल्या खात्रीलायक माहितीनुसार लगेच्या लगे आजच 20 हजार मोदक, 10 हजार मोदक लोकसभेच्या निवडणुकीच्यावेळी आणि 20 हजार मोदक विधानसभेच्या निवडणुकीच्यावेळी ते नांदेड जिल्ह्यात डोंगरांच्यामध्ये वसलेल्या गावातील एका नेत्याला द्यायला तयार झाले आहेत. 50 हजार मोदकांची संख्या एवढी भारी आहे की, तिला नाकार देणे नेत्याला अवघड झाले आहे. कारण पुढे येणाऱ्या निवडणुकांचा खर्च त्या 50 हजार मोडकांनी भागवला जाणार आहे. नांदेड जिल्ह्यातील अनेक नेते या विरोधात आहेत की, त्या नेत्याला 50 हजार मोदक मिळणार आहेत. या 50 हजार मोदकांची माहिती नांदेड जिल्ह्याच्या काही नेत्यांनी उपमुख्यमंत्र्यापर्यंत पोहचवली सुध्दा आहे. हा नवीन प्रकार धंदा सुरू झाल्यामुळे लोकशाही किती मजबुत आहे हे समोर आले. संख्येच्या हिशोबाने जास्त नेते या विरोधात असतांना फक्त एका नेत्याचे उपमुख्यमंत्री ऐकतील काय? हा ही प्रश्न आहे. नांदेडमधील योगेश्र्वर माझे ऐकणार नाहीत म्हणूनच या नेत्याने पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवारची दिवाळी खराब करण्यासाठी मुंबईत ठाण मांडली आहे. पाहुया योगेश्र्वर जिंकतात की, नेताजी जिंकतात?

पुढे 50 हजार मोदक प्रसाद म्हणून चदवणाऱ्या पोलीस निरीक्षकांना काय अपेक्षा असतील या बद्दल आजच लिहून घाई होणार आहे. मात्र हे नक्की की,50 हजार मोदकांचा प्रसाद वाटणाऱ्याला त्या 50 हजार मोदकांचा गुणाकार 50 हजारांनीच करावा अशीच मानसिकता असणार आहे.त्या मानसिकते सोबत योगेश्वरांच्या आदेशात काम करण्याचे आव्हान सुद्धा आहे.असे घडलेच तर वास्तव न्यूज लाईव्ह आपल्या समोर सत्य मांडण्यासाठीच काम करत आहे आणि करत राहणार याचे वचन देत आहे.अश्या प्रकारे मुंबई येथून प्रचंड दबाव तयार करून नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या खुर्चीवर आपल्याला ५० हजार मोदक देणाऱ्याची वर्णी लावण्यासाठी सुरु असलेली हि धडपड पाहताना आणि शब्दात वर्णन करतांना आज असेही म्हणावे लागेल की,पोलीस अधीक्षक बनण्यासाठी खूप मेहनत करावी लागते आणि नंतर असे प्रचंड दबाव सहन करण्याची तयारी असावी लागते.परीक्षार्थी मित्रांनो पोलीस अधीक्षक व्हायचे असेल तर या प्रचंड दबावाला सहन करण्याची ताकत सुद्धा तयार करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *