नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी; शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा

नांदेड(प्रतिनिधी)-कौशल्यनगर धनेगाव येथे चोरट्यांनी घरफोडून 1 लाख 86 हजार 100 रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. तसेच हिंगोली गेट रेल्वे रुळांजवळ एका 29 वर्षीय व्यक्तीला मारहाण करून त्याचा मोबाईल घेवून काही दरोडेखोर पळून गेले आहेत.
धनेगाव येथील जगदीप लिंबाजी लोंडे या एलआयसी एजंटने दिलेल्या तक्ररीनुसार दि.29 जानेवारीच्या पहाटे 5 ते 1 जानेवारीच्या पहाटे 6.30 वाजेदरम्यान ते आणि त्यांचे कुटूंबिय आपले घर बंद करून त्यास कुलूप लावून बाहेर गेले होते. सकाळी घरी परत आल्यावर त्यांच्या घराचे कुलूप तोडलेले दिसले. चोरट्यांनी त्यांच्या घरातून सोन्याच्या दोन अंगठ्या, कानातील झुमके, सोन्याचे मनीमंगळसुत्र, सोन्याचे ओम पान, सोन्याच्या दोन लहान मुलांच्या दोन अंगठ्या, चांदीचे जोडवे आणि रोख रक्कम 12 हजार रुपये असा एकूण 1 लाख 86 हजार 100 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. नांदेड ग्राीमण पोलीसांनी हा घटनाक्रम गुन्हा क्रमांक 87/2024 नुसार पोलीस अभिलेखात दाखल केला आहे. पोलीस निरिक्षक नागनाथ आयलाने यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक महेश कोरे यांच्याकडे तपास देण्यात आला आहे.
दि.31 जानेवारीच्या सायंकाळी 7 वाजता अमोल नागनाथ चुनूकवार (29) हे रेल्वे उड्डाणपुल हिंगोलीगेट जवळून रेल्वे रुळांपासून रेल्वेस्टेशनकडे जात असतांना 5 किंवा त्यांपेक्षा जास्त अज्ञात लोकांनी त्यांच्या उजव्या पायाच्या पोटरीवर, डाव्या पायाच्या पोटरीवर, डाव्या हाताच्या तळहातावर, अंगठ्यावर खंजीरने वार करून त्यांना जखमी केले आणि त्यांच्या जवळील 36 हजार रुपये किंमतीचा मोबाईल दरोडा टाकत घेवून पळून गेले आहेत.
घटना घडताच पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक, शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक मोहन भोसले आदींनी त्वरीत घटनास्थळी भेट दिली. या घटनेची नोंद गुन्हा क्रमांक 43/2024 नुसार पोलीस अभिलेखात झाली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक आश्रुबा घाटे यांच्याकडे देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *