नांदेड जिल्हा मध्यवत्ती सहकारी बॅंकेतील बनावट एटीएम कार्ड बाबत अखेर गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या विविध शाखांमध्ये खोटे एटीएम कार्ड बनवून गरीब शेतकऱ्यांचे पैसे लुटण्याचा प्रकार सुरू आहे. या संदर्भाने उमरी पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल झाला आहे.
सौ.निशा विजय सोनवणे यांच्या तक्रारीवरुन सावरगाव (द) ता.उमरी येथे त्यांची एक हेक्टर 74 आर अशी शेती आहे. या शेतीच्या बॅंक खात्यात त्यांचे 19 हजार 856 रुपये अनुदान जमा झाले. ते अनुदानाचे पैसे ज्या बॅंक खात्यात जमा झाले. ती बॅंक नांदेड जिल्हा मध्यवत्ती सहकारी बॅंक आहे. सौ.निशा सोनवणे यांनी त्या बॅंकेच्या खात्यावर एटीएम कार्ड घेतलेले नाही. 4 ऑगस्ट रोजी त्यांनी पैसे उचलण्यासाठी उमरी जिल्हा मध्यवत्ती सहकारी बॅंकेत गेले असतांना त्यांच्या खात्यात पैसेच नाहीत असे बॅंकेचे व्यवस्थापक एस.डी.राजपुत यांनी सांगितले. हे अनुदानाचे पैसे एटीएम कार्डद्वारे किवळा ता.लोहा येथे काढून घेण्यात आल्याची माहिती दिली.
आमच्याकडे एटीए कार्डच नाही तर एटीएम कार्ड कोणी काढले, एटीएम कार्ड देण्यास कोणी परवानगी दिली, एटीएम कार्ड मागणीचा अर्ज आहे काय, मग एटीएम कार्ड घेतले कोणी असे अनेक प्रश्न निर्माण झाले. तेंव्हा असे लक्षात येते की, अनेक शेतकरी मरण पावले आहेत, अनेक गाव सोडून गेले आहेत, अनेकांना त्या अनुदानाची गरज नाही म्हणून त्याकडे दुर्लक्ष होते. अशा अनेक कारणांचा फायदा घेत बॅंक प्रशासन आणि काही ठकसेनांनी ही शक्कल लढवली आणि बनावट एटीएम कार्ड काढून शेतकऱ्यांच्या अनुदानाचे पैसे उचलून घेण्याचे एक रॅकेट सुरू झाले आहे.
एटीएम कार्ड देणे ही एक लांबलचक प्रक्रिया आहे. मग सौ.निशा विजय सोनवणे यांच्या एटीएम कार्डवर स्वाक्षरी कोणी केली हा ही प्रश्न या संदर्भाने समोर आला आहे. नांदेड जिल्हा मध्यवत्ती सहकारी बॅंक काही पदाधिकाऱ्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे देशोधडीला लागली असतांना त्यात अशी धोखागडी सुरू झाली आहे.
सौ.निशा विजय सोनवणे यांच्या तक्रारीवरुन उमरी पोलीसांनी गुन्हा क्रमांक 231/2023 भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 468, 471 नुसार एका अज्ञात व्यक्तीवरुध्द दाखल केला आहे. खरे तर या रॅकेटमध्ये एक अज्ञात व्यक्ती नाही तर असंख्य अज्ञात लोक असतील ज्यांनी शेतकऱ्यांचे बनावट एटीएम कार्ड काढून त्यांच्या अनुदानाची रक्कम लाटण्याचा धंदा सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *