नांदेड(प्रतिनिधी)- पारंपारिक वृक्षांची लागवड करून त्याचे जतन करावे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या तसेच जिल्हा परिषद सदस्या प्रणिताताई देवरे-चिखलीकर यांनी केले. आज लोहा तालुक्यातील डेरला येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षलागवड करण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या. नांदेड दक्षिणचे आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात पंचायत समितीचे सभापती आनंदराव पाटील ढाकणीकर, उप सभापती नरेंद्र गायकवाड, मार्केट कमिटीचे उप सभापती बळीराम पाटील कदम, माजी उप सभापती लक्ष्मणराव बोडके, शंकरराव ढगे, गट विकास अधिकारी डॉ. प्रकाश जोंधळे, सोनखेडचे पोलीस उपनिरीक्षक महादेव मांजरमकर, कृषी अधिकारी बी. बी. भोसले, उप सरपंच उमाकांत शिंदे आदींची उपस्थिती होती.
पुढे त्या म्हणाल्या, पिंपळ, वड कडुनिंब यासारखी झाडे लावावीत. ही वृक्ष वातावरणातील प्रदूषण कमी करुन स्वच्छ हवा देतात. म्हणून अशा वृक्षांचे रोपण करून त्याचे जतन करण्याचे आवाहन प्रणिताताई देवरे-चिखलीकर यांनी केले.
अध्यक्षीय समारोपात आमदार मोहनराव हंबर्डे म्हणाले, पर्यावरणाचे रक्षण करणे काळाची गरज आहे. पर्यावरण शुद्ध राहिले नाही तर जीवसृष्टी धोक्यात येऊ शकते. त्यामुळे होणारा ऱ्हास लक्षात घेता पर्यावरण रक्षणासाठी समाजाने पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमाला लोंढे सांगवीचे सरपंच रंगराव लोंढे, साईनाथ टर्के, टेळकीचे सरपंच संदीप मोरे, झरीचे सरपंच विलासराव रिंगे, स्वच्छता तज्ञ विशाल कदम, श्याम गीरे, विस्तार अधिकारी देशपांडे, मेहेत्रे, संभाजी तोटेवाड, कामाजी कदम आदींची उपस्थिती होती.