पोलीस स्थापना सप्ताहात पोलीस विभागातर्फे विविध कार्यक्रम

नांदेड(प्रतिनिधी)-2 जानेवारी हा दिवस पोलीस स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती पोलीस विभागाने प्रसिध्दीसाठी पाठविली आहे.
भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी पुणे येथील पोलीस आयुक्त सुब्रम्हण्यम यांना आज अस्तित्वात असलेला पोलीस ध्वज प्रधान केला होता. पोलीस रेजिंग डे सप्ताह निमित्त पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनात दि.2 जानेवारी 2024 ते 8 जानेवारी 2024 दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. दि.2 जानेवारी रोजी सकाळी 7 ते 8 वाजेदरम्यान विशेष दौड आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, पोलीस मित्र, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी भाग घेतील. पोलीस बॅंन्ड पथक वजिराबाद आणि इतवारा हद्दीत आपल्या कलेचे प्रदर्शन करणार आहे. दि.3 जानेवारी रोजी पोलीस अधिक्षक कार्यालयात ज्येष्ठ नागरीकांची बैठक घेऊन त्यांच्या सर्व समस्या ऐकून त्यांना सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ही बैठक महिला सहाय्यक कक्षाने आयोजित केली आहे. त्याच दिवशी पोलीस बॅन्ड पथक भोकर येथे आपले प्रदर्शन सादर करेल. दि.4 जानेवारी रोजी पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, महिला पोलीस शाळा आणि महाविद्यालयास भेटी देवून महिला सुरक्षा विषयी माहिती देतील. तसेच शाळा व महाविद्यालयात मुला-मुलींच्या अडचणी समजून घेतील. त्या दिवशी पोलीस बॅन्ड पथक भाग्यनगर आणि विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुख्य चौकांमध्ये आपले प्रदर्शन सादर करतील. 5 जानेवारी रोजी जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात जप्त असलेल्या मौल्यवान मुद्देमालाची निरगती करण्यासाठी कोर्टाच्या आदशेानुसार काम करेल. तसेच परेड होईल. शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शस्त्र प्रदर्शन, श्वान पथकाचे प्रदर्शन दाखविण्यात येईल. दि.6 जानेवारी रोजी पत्रकार दिनाच्या अनुषंगाने पत्रकारांची बैठक जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी 4 ते 6 वाजेदरम्यान पोलीस बॅन्ड पथक आपले प्रदर्शन सादर करतील. 7 जानेवारी रोजी अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुख्य चौकात पोलीस बॅन्ड पथक आपले प्रदर्शन सादर करतील. 8 जानेवारी रोजी शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वकृत्व स्पर्धा घेण्यात येतील. पोलीस ठाणे लोहाच्या मुख्य चौकात पोलीस बॅन्ड पथक आपली कला प्रस्तुत करेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *