नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील बाफना रस्त्यावर एक टायरचे दुकान फोडून चोरट्यांनी 3 लाख 29 हजार रुपयांचा ऐवज लांबवला आहे. हिमायतनगर शहरात एक बंद घर फोडून चोरट्यांनी 62 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. मौजे बोधडी ता.किनवट येथे एक बिअर बार फोडून चोट्यांनी विदेशी दारु लांबवली आहे. पाटनूरकर नगर नांदेड येथून एक दुचाकी चोरीला गेली आहे. डॉक्टर्सलेनमधील निर्मल हॉस्पीटलमधून एक मोबाईल चोरीला गेला आहे. चोऱ्यांच्या या पाच घटनांमध्ये 4 लाख 51 हजार रुपयांच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे.

राजेंद्र प्रल्हादराव भंडारी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बाफना रस्त्यावर त्यांचे भंडारी टायर्स नावाचे दुकान आहे. 8 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजता त्यांनी आपले दुकान बंद केले होते. 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता दुकान उघडण्यासाठी आले तेंव्हा त्यांच्या दुकानाचे शटर तोडलेले होते. तपासणी केली असता 2 लाख 89 हजार 400 रुपयांचे विविध कंपन्यांचे टायर आणि 40 हजार रुपये रोख रक्कम असा 3 लाख 29 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवलेला होता. इतवारा पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक गणेश गोटके अधिक तपास करीत आहेत.
संजय कोंडीबाराव शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 8 ऑक्टोबरच्या रात्री 9 ते 9 ऑक्टोबरच्या दुपारी 2 वाजेदरम्यान छोटी गुजरी चौक हिमायतनगर येथील त्यांचे घर बंद करून त्यांचे आई-वडील बाहेरगावी गेले होते. कोणी तरी चोरट्यांनी त्यांचे घर फोडून सोन्या-चांदीचे दागिणे व रोख रक्कम असा 62 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. हिमायतनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार शेख नायक अधिक तपास करीत आहेत.
भाजपा अध्यक्ष संदीप सोपानराव केंद्रे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बोधडी येथील त्यांचे रुद्रा बार कोणी तरी चोरट्यांनी 8-9 ऑक्टोबरच्या रात्री तोडले आणि त्यातून 17 हजार 600 रुपयांची विदेशी दारू चोरली. किनवट पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार पांढरे अधिक तपास करीत आहेत.
श्रीपाद बाबूराव शहाणे यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 एक्स.4220 ही 6 ऑक्टोबरच्या रात्री 10 ते 7 ऑक्टोबरच्या सकाळी 9 वाजेदरम्यान चिंन्मय अपार्टमेंट पार्कींगमधून चोरीला गेली आहे. या गाडीची किंमत 25 हजार रुपये आहे. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस अंमलदार सातारे हे करीत आहेत.
भास्कर पंडीत चावरे हे 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 1 वाजेदरम्यान डॉक्टर्सलेनमधील निर्मल हॉस्पीटलच्या जनरल वार्डमध्ये असतांना त्यांचा 17 हजार रुपये किंमतीचा मोबाईल कोणी तरी चोरून नेला आहे. वजिराबाद पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार शिंगे अधिक तपास करीत आहेत.