नांदेड(प्रतिनिधी)-गट विकास अधिकारी पंचायत समिती बिलोली यांना भारतीय जनता पार्टीचे पंचायत समिती उपसभापती यांनी अत्यंत घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करून त्यांच्या शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी बिलोली पोलीसांनी उपसभापतीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे आणि सभापतीला शोधण्यासाठी बिलोलीचे पोलीस पथक रवाना झालेले आहे.
बिलोली पंचायत समितीमधील गटविकास अधिकारी प्रकाश वसंतराव नाईक (54) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.10 नोव्हेंबर रोजी ते आपले कार्यालयीन कामकाज करीत असतांना दुपारी 2 वाजेच्यासुमारास कनिष्ठ लिपीक मजहर कुरेशी यांनी येवून त्यांना सांगितले की, उपसभापती साहेबांनी तुम्हाला निवासस्थानात बोलवले आहे. काम बाजूला ठेवून मी मजहर कुरेशीसोबत उपसभापती शंकर माधव यंकम यांच्या घरी गेलो. त्यावेळी त्यांनी मजहर कुरेशीला घराबाहेर जायला सांगितले आणि घराचे दार आतून लावून घेतले. घरात उपसभापतीचे मित्र रामपुरे हजर होते. त्यानंतर अत्यंत अश्लिल भाषेत शिवीगाळ करून दिवाळीपासून तु ऑफीसला का आला नाहीस असे सांगत मला धक्काबुक्की केली, माझे शर्ट फाडले त्यावेळी रामपुरे यांनी भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला असता ते थांबले नाहीत आणि माझ्या शासकीय कामात अडथळा केला आहे. बिलोली पोलीसांनी या तक्रारीवरुन भारतीय जनता पार्टीचे बिलोली पंचायत समिती उपसभापती शंकर माधव यंकम यांच्याविरुध्द गुन्हा क्रमांक 225/2021 भारतीय दंड संहितेच्या कलम 353, 332, 342, 294, 504 आणि 506 नुसार दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू असून उपसभापतीला शोधण्यासाठी बिलोली पोलीस पथक रवाना झाले आहे.
बिलोली घटनेचा निषेध

बिलोली येथील गटविकास अधिकाऱ्याला मारहाण झाल्याप्रकरणी जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्यावतीने आज निषेध व्यक्त करण्यात आला असून त्यांनी काळ्या फिती लावून काम केले. आपल्या निषेधाचे निवेदन संघटनेने निवासी उपजिल्हाधिकारी यांना दिले आहे. यावेळी संघटनेचे बाबूराव पुजरवाड, राघवेंद्र मदनूरकर, पवन तलवारे, सिध्दार्थ हत्तीअंबीरे, ग्रामसेवक युनियनचे हणमंत वाडेकर, धम्मानंद धोतरे, श्रीनिवास मुगावे आदी हजर होते.