नांदेड(प्रतिनिधी)-मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्र्वभुमीत कार्यकर्त्यांनी केलेल्या दगडफेकीत पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या डाव्या हाताच्या कोपऱ्याला दगड लागून ते जखमी झाले आहेत. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी महामार्गावरील कोणत्याही आंदोलनास बंदी केली आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणास बसल्यानंतर राज्यात विविध ठिकाणीवर महामार्गावर झाडे तोडून, दगडे टाकून, टायर जाळून सार्वजनिक वाहतुकीला अडविण्याचे प्रकार सुरू झाल्यानंतर सामान्य नागरीक, रुग्ण वाहिका यांना त्या आंदोलनाचा अडथळला होत आहे.यासाठी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराय धरणे आणि इतर सर्व अधिकारी जिल्ह्यात फिरत असतांना घुंगराळा जवळील एका कारखान्यासमोर आंदोलकांनी केलेल्या बाचाबाचीमध्ये दगडफेक झाली. त्यात पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या डाव्या हाताच्या कोपऱ्याला दगडफेकीतील एक दगड लागला आणि त्यात ते जखमी झाले. सोबत अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार हे नेहमीच चष्मा वापरतात आणि आज आंदोलनाच्या पार्श्र्वभूमीवर डोक्याला हेल्मेट लावले होते. त्यामुळे तेथे झालेल्या बाचाबाचीत त्यांच्याही नाकाजवळ खरचटले गेले आहे.
भारतीय संविधानाने आपले आंदोलन शांततेत करण्यासाठी आम्हाला अधिकार दिलेला आहे. आमच्या जिल्ह्याच्या सेवेत आलेल्या अधिकाऱ्यांवर हल्ला होत असेल, त्यांना मार लागत असेल तर त्या आंदोलनाची पाठराखण करणे अशक्यच आहे. आजच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदाराच्या घरावर झालेल्या हल्याबाबत अत्यंत कडक भुमिका घेतली आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सुध्दा नांदेड जिल्ह्यात 144 कलम लागू केले आहे. त्यानुसार 5 किंवा 5 पेक्षा जास्त लोक एकत्र राहु शकत नाहीत, कोठे फिरू शकत नाहीत सोबतच त्यांच्या आदेशात महामार्गावरील कोणत्याही आंदोलनास, जमावास त्यांनी परवानगी नाकारली आहे. जनतेने सुध्दा पोलीसांना साथ देण्याची गरज आहे. कारण ते आपल्या सुरक्षेसाठी झटत आहेत. आज पोलीस अधिक्षक जखमी झाले आहेत, अप्पर पोलीस अधिक्षकांच्या नाकाजवळ खरचटल्याचे निशाण झाले आहे ही नांदेड जिल्ह्याची परंपरा नव्हे. वास्तव न्युज लाईव्हच्यावतीने आम्ही नमुद करू इच्छीतो की, नांदेड शहरात श्री.गुरू गोविंदसिंघजींच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेल्या या भुमित गुरू महाराजांनी सांगितलेले वाक्य आहे की, “जिस के सिर उपर तु स्वामी सो दु:ख कैसा पावे’. नांदेड जिल्ह्यात योगेश्र्वरांच्या सानिध्यात आणि गुरू महाराजांच्या आशिर्वादात त्यांनी आज घेतलेली पाऊले योग्यच आहेत. जनतेने सुध्दा त्यांना साथ द्यायला हवी.
मराठा आंदोलनात पोलीस अधिक्षक दगडफेकीत जखमी